चक्क ग्राहकांनी जाळले स्वत:चेच वीजमीटर 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 मार्च 2018

नागपूर - एसएनडीएलच्या पथकाने 14 व 15 मार्च रोजी ताजबाग परिसरात कारवाई करीत एकूण 94 वीजचोऱ्या उघडकीस आणल्या. त्यानंतर अचानक या वस्तीतील घरांमध्ये लागलेले 25 वीजमीटर जळाले. चौकशीत वीजग्राहकांनीच कारवाईच्या भीतीने हे मीटर जाळल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. 

नागपूर - एसएनडीएलच्या पथकाने 14 व 15 मार्च रोजी ताजबाग परिसरात कारवाई करीत एकूण 94 वीजचोऱ्या उघडकीस आणल्या. त्यानंतर अचानक या वस्तीतील घरांमध्ये लागलेले 25 वीजमीटर जळाले. चौकशीत वीजग्राहकांनीच कारवाईच्या भीतीने हे मीटर जाळल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. 

एसएनडीएलचे पथक बुधवारी कारवाईसाठी गेले असता, असामाजिक तत्त्वांनी दगडफेक करून त्यांना परतवून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तगड्या पोलिस बांदोबस्तामुळे त्यांचा विरोध तोकडा ठरला. यानंतर चार वेगवेगळ्या पथकांकरवी वीजमीटरमध्ये तपासणी करण्यात आली. परिसरातील 103 वीजमीटर तपासले असता, त्यात तब्बल 94 मीटरमधून सुमारे 38.4 लाखांची वीजचोरी झाल्याचे निष्पन्न झाल्याने संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात आली. कारवाई सुरू असतानाच गुरुवारी काही घरांमधील वीजमीटर जळाल्याचे आढळले. दुसऱ्या दिवशी (ता. 16) पुन्हा काही घरातील वीजमीटर जळाल्याचे दिसून आले. एकाच वस्तीतील वीजमीटर जळण्याचे प्रमाण 70 टक्के असल्याने कर्मचाऱ्यांचा संशय बळावला ग्राहकांना विश्‍वासात घेऊन चौकशी केली असता, कुणी स्वत:हून मीटर शॉट केले, कुणी ज्वलनशील पदार्थ टाकून जाळले किंवा काहींनी लोखंड कापण्याच्या यंत्राच्या मदतीने जाळल्याचे पुढे आले. चौकशीतच ताजबाग येथील शिबू रेहान, मोमिनपुऱ्यातील छोटू आणि शकील वीजमीटर टॅम्परिंग करण्याचे काम करीत असल्याचेही स्पष्ट झाले. मीटर टॅम्परिंग करून वीजचोरी करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून त्यांना सहकार्य करणाऱ्यांविरुद्धही गुन्हा दाखल करण्याचा इशारा एसएनडीएलने दिला आहे. 

अनेक घरांना कुलूप 
एसएनडीएलच्या दोनदिवसीय कारवाईनंतर परिसरातील अनेक नागरिक घराला कुलूप लावून बाहेर निघून गेल्याचेही दिसून येत आहे. बुधवारी सायंकाळपासूनच अनेक नागरिक पसार असल्याचे कळते. या भागात कारवाई नवी नाही. यामुळे वीजचोरीला आळा घालण्यासाठी नियमित स्वरूपात अकस्मात भेटी देण्याची गरज असल्याचे या भागातीलच जागरूक नागरिकांचे म्हणणे आहे. 

Web Title: marathi news nagpur news MSEB electric meter