पोकळ आश्‍वासनेच, मालमत्ता कराने कंबरडे मोडले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

सत्ताधाऱ्यांना केवळ पाच वर्षांनीच नागरिकांबाबत जाग येते, हे वास्तव आहे. त्यामुळे आताच अपेक्षा करणे चुकीचे आहे. 
- जगदीश पाटमासे.

नागपूर - निवडणुकीपूर्वी दिलेली आश्‍वासने पूर्ण करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी कुठलेही प्रयत्न केले नाही. वर्षाच्या शेवटी मालमत्ता कराने कंबरडे मोडले. त्यामुळे सत्ताधारी जनतेपासून दूर जात आहे की काय? अशी भीती अनेकांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली.

महापालिकेत भाजपने हॅट्‌ट्रीक साधल्यानंतर पहिल्या वर्षातील वैशिष्ट्यांसह ‘सकाळ’ने आज वृत्त प्रकाशित केले. या वृत्तांवरून नागरिक, माजी नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांच्या वर्षपूर्तीवर  प्रतिक्रियांचा पाऊस पाडला. अनेकांनी कडवड प्रतिक्रिया दिल्या. त्याचवेळी काहींनी सत्ताधाऱ्यांना आणखी चार वर्षांचा वेळ असल्याचेही नमूद केले. काहींनी पदाधिकाऱ्यांच्या कारभारावर वैयक्तिक मतही व्यक्त केले. शहरातील विकासकामे करीत असताना नागरिकांच्या सुविधेकडे दुर्लक्ष होत असून त्याबाबत सत्ताधाऱ्यांनी हातावर हात धरल्याबाबत आश्‍चर्यही व्यक्त केले जात आहे. सिमेंट रस्ते तयार करताना एका बाजूने रस्ता खोदून ठेवला तर दुसऱ्या बाजूने काम सुरू असल्याने नागरिकांची कोंडी होत आहे. नागरिकांच्या सुविधांकडे लक्ष द्यायला आता वेळच नसल्याचा टोलाही सत्ताधाऱ्यांना हाणला. शहरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेले विकासकामे हे सत्ताधाऱ्यांच्या शहर विकासाच्या आश्‍वासनपूर्तीकडे पाऊल असल्याचीही नोंद केली.

मालमत्ता कराने सामान्यांचे कंबरडे मोडणारी कामगिरी केली. आर्थिक संकट कायम असून त्यामुळे विकासकामे बंद आहेत. निवडणुकीपूर्वी पश्‍चिम नागपूरसाठी १० कोटींची तरतूद करण्याचे आश्‍वासन दिले. परंतु, सत्तेत येऊन वर्षपूर्ती झाली तरी पत्ता नाही. 
- अरुण डवरे, माजी नगरसेवक. 

शहरात ठिकठिकाणी खोदून ठेवल्याने नागरिकांना आता विकास नकोसा झाला. विकास करताना निदान नागरिकांना सुविधेबाबत पर्याय उपलब्ध करून देणे आवश्‍यक आहे. परंतु, याकडे आता सत्ताधाऱ्यांचे लक्षच नाही. 
- राजेश कुंभलकर 

शहरातील मोठ्या प्रमाणात सुरू असलेली विकासकामे सत्ताधाऱ्यांच्या गांभीर्याचाच परिणाम आहे. वर्षभरात काहीच केले नाही, असे म्हणता येणार नाही. 
- विकास बाभरे. 

Web Title: marathi news nagpur news municipal property tax