मोबाईल, शस्त्राचा शोध सुरू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 फेब्रुवारी 2018

नागपूर - उषाबाई कांबळे व दीड वर्षीय नात राशी यांच्या दुहेरी हत्याकांडात आरोपीच्या कुटुंबीयांचा सहभाग असून, घटनेच्या दिवशी मुख्य आरोपीचे आई-वडीलही नागपुरातच होते अशी चर्चा आहे. त्यामुळे पोलिसांनी मंगळवारी आरोपीच्या कुटुंबीयांची कसून चौकशी केली. तसेच उषाबाई यांचा मोबाईल शोधण्याचा प्रयत्न केला. ज्या शस्त्राने गळा चिरला, ते शस्त्र अजूनही पोलिसांच्या हाती लागले नाही. आरोपी शस्त्राबाबत माहिती देत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. पोलिसांची चार पथके रात्रंदिवस कार्यरत आहेत.

शनिवारी रात्रीच्या सुमारास पत्रकार रविकांत कांबळे यांची आई उषाबाई कांबळे व मुलगी राशी यांचा गणेश शिवचरण शाहू (रा. पवनपुत्रनगर) व कुटुंबीयांनी निर्घृणपणे गळा चिरून खून केला. दुहेरी हत्याकांड एकट्यानेच केल्याचे गणेश सांगत असला तरी गर्भवती पत्नी गुड्डी, भाऊ अंकित आणि सिद्धू यांचाही यात समावेश आहे. सोबतच गणेशचे वडील शिवचरण आणि आई गीताबाई हे दोघेही घटनेच्या दिवशी घरातच होते. त्यांचाही या हत्याकांडात सहभाग आहे. त्यांना दुपारी दोन वाजताच्या सुमारास घरी पाहिल्या गेल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिली. त्यामुळे शाहू कुटुंब उषा कांबळे व राशी हत्याकांडात सहभागी असल्याची चर्चा आहे. मात्र, आरोपी गणेश शाहूने आईवडील सूरतला गेल्याचे सांगून हत्याकांडातून आई-वडिलांना दूर सारले आहे. 

पोलिस उपायुक्‍त नीलेश भरणे या हत्याकांडाचा स्वतः बारकाईने अभ्यास करून तपासाला दिशा देत असल्याची माहिती आहे. गणेश शाहूला पोलिसांनी घटनेच्या चोवीस तासांतच अटक केली असून, तो २३ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत आहे. पत्नी गुड्डी ‘ती मी नव्हेच’ अशी भूमिका घेत असून, घटनेनंतर गुड्डीनेच रक्‍ताने माखलेले कपडे पेटवले होते. तसेच घरातील फरशीवरील रक्‍ताचे डागही पुसले होते. गणेश-गुड्डीसह आणखी चौघांचा समावेश या हत्याकांडात असल्याचे बोलले जाते.

जलदगती न्यायालयात खटला चालवा
‘नागरिक हक्क संरक्षण’ साप्ताहिकतर्फे मंगळवारी संविधान चौकात पत्रकार रविकांत कांबळे यांच्या मातोश्री उषा कांबळे, दीड वर्षीय राशी कांबळे यांना मूक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दुहेरी हत्याप्रकरणाची जलदगती न्यायालयात सुनावणी व्हावी, ॲड. उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्त करावी, अशी मागणी जनार्दन मून यांच्यासह पत्रकार, हितचिंतकांनी गृहमंत्री कार्यालयाकडे निवेदनाद्वारे केली.

Web Title: marathi news nagpur news murder case mobile weapon searching