रॅगिंगच्या नावाखाली मूत्रमिश्रीत द्रव्य पाजणार्‍या 8 विद्यार्थ्यांना अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 मार्च 2018

नागपूर : वसतिगृहात रॅगिंगच्या नावाखाली एका विद्यार्थ्याला मूत्रमिश्रीत द्रव्य पाजणाऱ्या 10 ते 15 विद्यार्थ्यांवर अजनी पोलिसांनी गुन्हे दाखल केले. त्यापैकी आठ विद्यार्थ्यांना अटक केली असून अन्य विद्यार्थ्यांची भूमिका पोलिस तपासत आहेत.

नागपूर : वसतिगृहात रॅगिंगच्या नावाखाली एका विद्यार्थ्याला मूत्रमिश्रीत द्रव्य पाजणाऱ्या 10 ते 15 विद्यार्थ्यांवर अजनी पोलिसांनी गुन्हे दाखल केले. त्यापैकी आठ विद्यार्थ्यांना अटक केली असून अन्य विद्यार्थ्यांची भूमिका पोलिस तपासत आहेत.

21 फेब्रूवारीला घडलेली ही घटना अजनी पोलिसांनी दडपण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, "सकाळ'ने प्रकरणावर वृत्त प्रकाशित केल्यानंतर आदिवासी विभाग आणि पोलिस प्रशासन खळबडून जागी झाला. प्रशासनाने गांभीर्याने दखल घेत अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला तर आदिवासी विभागाने प्रकल्प अधिकारी दिगांबर चव्हाण यांच्या
नेतृत्वात ताबडतोब चौकशी समिती स्थापन करून अहवाल मागितला आहे.

बॉस उर्फ प्रशिल सुधाकर उईके, दुर्गेश सूरजलाल कोल्हारे, राजू जुगलाल सलामे,
देवेंद्र कार्तीकराम मडावी, तुकाराम मधुकर बुरकुले, शुभम मधूकर मडावी,
प्रवीण रामरास गेडाम, स्नेहल पुनिराम राऊत अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

कुकडे ले-आऊट आदिवासी वसतिगृहात राहणारा विष्णू भारत पवार (वय 21, शेलू,
परभणी) या बीएएमएसच्या द्वितीय वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्याला 21 फेब्रूवारीला मध्यरात्रीच्या सुमारास रूम नं.205 मध्ये 10 ते 15 सिनिअर्स विद्यार्थ्यांना जबर मारहाण केली. त्याचे कपडे काढून अंगावर मूत्रविसर्जन केले. त्यानंतर त्याला बॉटलमध्ये मूत्रात ऑर्गेनिक फास्फेट टाकून ते द्रव्य बळजबरीने पाजले होते. बेशुद्ध पडलेल्या विष्णूवर दोन दिवस मेडिमलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, प्रकृती अधिक खालावल्याने सीताबर्डीतील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणाला अजनी पोलिसांनी पद्धतशिरपणे दडपण्याचा प्रयत्न केला.

तसेच प्रशिल उईके याची नातेवाईक असलेल्या महिला सहायक पोलिस निरीक्षकाने अजनी पोलिसांवर गुन्हा न दाखल न करण्यासाठी दबाव आणला होता. मात्र, अतिदक्षता विभागात जीवन-मृत्यूशी संघर्ष करीत असलेल्या विष्णूच्या वडीलांनी "सकाळ'शी संपर्क साधला. "सकाळ'ने अजनी पोलिस आणि आदिवासी
विभागाकडून होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली. त्यानंतर अजनी पोलिसांनी
तडकाफडकी गुन्हा दाखल केला. मात्र, विष्णूचे बयाण बदलण्यासाठी अजनी
पोलिसांनी दबाव टाकला होता. शेवटी विष्णूने बयाण देण्यास नकार दिल्यामुळे
आणि प्रसारमाध्यमांच्या रेट्यामुळे अजनी पोलिसांनी आठ विद्यार्थ्यांना
बुधवारी रात्री उशिरा अटक केली.

पवार कुटूंब दिवसभर उपाशी
अजनी पोलिसांनी सकाळी दहापासून विष्णूचा जबाब नोंदविण्यास सुरूवात
केली. त्यावेळी वडील भारत पवार, आई मीना, काकू आणि दोन चुलत भाऊ
रूग्णालयात उपस्थित होते. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत अजनी पोलिस ठाण्यात पवार कुटूंबीयांना बसवून ठेवण्यात आले. विष्णूचे आईवडीलासह सर्व नातेवाईक बुधवारी सकाळपासून उपाशीच पोलिसांच्या विनवण्या करीत होते.

गृहपालाला कारणे दाखवा
नागपूर : एकात्मिक आदिवासी विकास विभागाच्या कुकडे ले-आउट येथील
शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहात झालेल्या विद्यार्थ्याच्या रॅगिंगच्या नावावर मारहाण केली. या प्रकरणाची विभागाने गंभीर दखल घेतली असून, वसतिगृहातील गृहपालांना कारणे दाखवा नोटीस बजाविल्याची माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी डिगांबर चव्हाण यांनी दिली आहे.

शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहात बी.ए.एम.एस. द्वितीय वर्षातील विष्णू भारत पवार या विद्यार्थ्याला रॅगिंगच्या नावावर मारहाण करण्यात आली. या प्रकरणामधील आठ विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द केले आहे. तसेच वसतिगृहाचे गृहपालांनासुद्धा कारणे दाखवा नोटीस दिली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याबाबत समिती गठित केलेली आहे. समितीचा अहवाल प्राप्त होताच पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही डिगांबर चव्हाण यांनी सांगितले.

Web Title: marathi news Nagpur News Nagpur Ragging Crime