कुष्ठरोग निर्मूलनासाठी सरकारचा ‘स्पर्श’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जानेवारी 2018

स्पर्श उपक्रमानंतर कुष्ठरोगमुक्त समाज निर्माण करण्यासाठी जनतेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. नियमित औषधोपचारातून कुष्ठरोगमुक्त झालेल्यांची संख्या मोठी आहे. सध्या या व्यक्ती सामान्य जीवन जगत आहेत. चट्टा दिसताच डॉक्‍टरांना दाखविल्यास कुष्ठरोग बरा होतो. 
- डॉ. विजय डोईफोडे, सहायक संचालक, कुष्ठरोग नियंत्रण विभाग, नागपूर.

नागपूर - नागरिकांना कुष्ठरोग व त्यामुळे येणाऱ्या विकलांगतेपासून दूर ठेवण्यासाठी प्रधानमंत्री प्रगती योजनेअंतर्गत राजधानीपासून तर महानगरपालिका, नगर परिषद आणि ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेच्या मदतीने राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम राबविण्यात आला आहे. याअंतर्गत १ एप्रिल ते डिसेंबर २०१७ या आठ महिन्यांत कुष्ठरुग्ण शोधमोहिमेतून पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये तीन हजार २७२ जणांना कुष्ठरोग असल्याचे आढळले. हे सर्व कुष्ठरुग्ण आता उपचार घेत आहेत. 

विशेष म्हणजे २०१६ मध्ये ही संख्या चार हजारांवर होती. या शोधमोहिमेसाठी आरोग्य विभागातील आशा स्वयंसेवकांपासून तर अंगणवाडीसेविका व इतर कर्मचाऱ्यांचे पथक कामाला लागले होते. या पथकातील आशा आणि स्वयंसेवकांनी घरोघरी भेट दिल्यानंतर पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांत एकूण तीन हजार २७२ कुष्ठरुग्ण आढळले. कुष्ठरोग झाल्यानंतर उशिरा निदान झाल्याने विकृती येते. उशिरा उपचारासाठी येण्याचे प्रमाण सहा टक्के होते. आता यात घट झाली असून, हे प्रमाण ३.८ टक्‍क्‍यांवर आले आहे. समाजातील गैरसमज दूर होत आहे. रुग्ण स्वतःहून उपचारासाठी येण्याचे प्रमाण वाढले असल्याचे कुष्ठरोग नियंत्रण विभागाचे सहायक संचालक डॉ. विजय डोईफोडे म्हणाले.

इतर आजारांप्रमाणे हा आजार आहे. या आजाराचा परिणाम त्वचा व मज्जांवर होत असून तो अल्प सांसर्गिक आहे. ‘एमडीटी’च्या नियमित उपचारातून बरा होतो. स्पर्श केल्याने, सोबत जेवल्याने कुष्ठरोग होत नाही. शरीरावर संवेदनहिन असा डाग, चट्टा कुष्ठरोग असू शकतो. यामुळे तत्काळ डॉक्‍टरचा सल्ला घ्यावा.
- डॉ. संजय मानेकर, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, आरोग्य विभाग (कुष्ठरोग), नागपूर

रुग्णांचे प्रमाण
१०५९ - चंद्रपूर
७३३ - गडचिरोली
६१४ - नागपूर (शहर जिल्हा)
४३२ - भंडारा
३३९ - गोंदिया
२४५ - वर्धा

दृष्टिकोन पूर्वीसारखा
नाशिक - कुष्ठरोग निर्मूलन आणि कुष्ठरुग्णांच्या पुनर्वसनाचा कार्यक्रम कागदी घोडे नाचविण्यापुरता सीमित राहिला आहे. आजाराचे वाढणारे प्रमाण आणि आर्थिक संकटामुळे रस्त्यावर विनवण्या करत फिरणारे कुष्ठरुग्ण याची साक्ष देत आहेत. त्यातूनच कुष्ठरोगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आजही पूर्वीसारखा कायम आहे. या रुग्णांना सन्मानाने उपचार मिळत नाहीत. केवळ सरकारी रुग्णालयातून मिळणाऱ्या औषध-गोळ्या आणि तुटपुंजी मदत एवढे उरले आहे. कुष्ठरुग्णांची वसाहत असा शिक्का नाशिकमधील वाल्मीकनगरला बसला आहे. त्यामुळे या भागातील रहिवाशांच्या मुलांना कामावर ठेवण्याचे धाडस कुणी करत नाही. वाल्मीकनगरमध्ये पूर्वी कुष्ठरुग्णांना पक्की घरे उपलब्ध करून दिली. आता त्या घराशिवाय ते इतरत्र जाऊ शकत नाहीत. बाहेर घर घेण्याची ऐपत राहिलेली नाही. अशा प्रकारे प्रगती खुंटली आहे. नोकऱ्या नसल्याने अवैध धंद्यांसाठी त्यांचा उपयोग करून घेतला जात आहे. विवाहेच्छूक मुलामुलींना इतर समाज स्वीकारत नाही. शेवटी कुष्ठरुग्णांच्या घरातील मुलामुलींशी विवाह केला जातो. परिणामी, कुष्ठरुग्णच एकमेकांचे नातेवाईक होतात.

संख्या होत आहे कमी
सोलापूर - कुष्ठरोगावर १९९० पासून बहुविध उपचार पद्धतीला सुरवात झाली. या पद्धतीमुळे कुष्ठरुग्णांची संख्या कमी होत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रातून औषधे दिली जातात. एप्रिल २०१७ ते डिसेंबर २०१७ मध्ये कुष्ठरुग्णांची संख्या १९१ आहे. यातील १०५ जणांचा शोध सप्टेंबर महिन्यात झालेल्या सर्वेक्षणातून लागला आहे. सरकारकडून पुरेशा प्रमाणात निधी दिला जात आहे, अशी माहिती आरोग्यसेवा (कुष्ठरोग), सोलापूरचे सहायक संचालक डॉ. अभिमन्यू खरे यांनी दिली.

Web Title: marathi news nagpur news National leprosy eradication government