पाळीव श्‍वानांना अस्वच्छतेसाठी मोकळीक

पाळीव श्‍वानांना अस्वच्छतेसाठी मोकळीक

नागपूर - शहरात सकाळी व सायंकाळी श्‍वानांना घेऊन फिरायला निघणाऱ्यांची दहशत पसरली आहे. पाळीव श्‍वानांना अस्वच्छतेसाठी मोकळीकच मिळाल्याने शहरातील विविध भागांत नाक मुरडणारे अनेकजण दिसून येतात. मात्र, महापालिकेला श्‍वानांची ही अस्वच्छता दिसत नाही काय? स्वच्छता अभियान केवळ कचरा गोळा करण्यापुरतेच मर्यादित आहे काय? श्‍वानांच्या अस्वच्छतेने आरोग्याच्या समस्या निर्माण होत नाहीत काय?, असे प्रश्‍न यानिमित्त उपस्थित झाले आहेत.

सकाळ होताच शहरात मोठ्या प्रमाणात नागरिक ‘मॉर्निंग वॉक’ला निघतात. नागरिकांना वेगवेगळ्या रस्त्यावर, मोकळ्या जमिनीवर, उद्यानाच्या बाजूलाच पाळीव श्‍वान अस्वच्छता करताना दिसून येत आहेत. त्यामुळे अनेकजण फिरण्याचा रस्ता बदलतात. परंतु, किती रस्ते बदलायचे, असा प्रश्‍न त्यांनाही पडू लागला आहे. काही वर्षांपूर्वी महापालिकेने श्‍वानांना प्रातर्विधीसाठी फिरायला घेऊन येणाऱ्यांवर दंड आकारणे सुरू केले होते. त्यामुळे पाळीव श्‍वानांच्या अस्वच्छतेवर काही प्रमाणात नियंत्रण आले होते. मात्र, महापालिकेचा कुठलाही उपक्रम क्षणिक ठरत असल्याने हा उपक्रमही थंडबस्त्यात गेला. त्यामुळे काही वर्षांत श्‍वान मालकांची हिंमत चांगलीच वाढली असून, आता उद्यानांत फिरायला येण्याचे निमित्त करून बाजूलाच श्‍वानांना ‘हलके’ करताना दिसून येत आहे.

काही नागरिक घरापासून लांब अंतरावर असलेल्या मोकळ्या जमिनीचा लाभ घेतात, तर काही रस्त्याच्या कडेलाच श्‍वानांची सोय करून देतात. स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत असताना शहराच्या विविध भागात श्‍वानांच्या विष्ठेने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. भगवाननगरातील मोकळे मैदान, ग्रेट नाग रोड, दत्तात्रयनगर उद्यानांचा बाजूचा परिसर, मानेवाडा रोड, रिंग रोड एवढेच नव्हे, तर नरेंद्रनगर उड्डाणपुलावरही सकाळी फिरताना एकामागे एक अनेक श्‍वान मालक दिसून येतात. सायंकाळीही काही भागात ही स्थिती दिसून येते. सकाळ व सायंकाळी रस्त्याच्या कडेला, मोकळ्या जागेवर अस्वच्छता करणारे श्‍वान महापालिकेला दिसत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे एकप्रकारे श्‍वानांच्या अस्वच्छतेला एकप्रकारे महापालिकेने मूक संमतीच असल्याचे दिसून येत आहे.

उपद्रव शोध पथकाला राजकीय अडथळे
शहर स्वच्छ राहावे या हेतूने महापालिकेने उपद्रव शोध पथक स्थापन करून स्वच्छतादूतांची नियुक्ती केली. अस्वच्छता पसरविणाऱ्यांवर दंडाची कारवाई करण्यास गेलेल्या स्वच्छतादूतांना अनेकदा नगरसेवक, राजकीय पक्षाचे नेतेच अडथळा निर्माण करीत असल्याचे सूत्राने नमूद केले. डिसेंबरपासून उपद्रव शोध पथकाने कारवाई सुरू केली असून, फेब्रुवारीपर्यंत पाच हजार नागरिकांकडून २५ लाखांवर दंड वसूल केला.

आली लहर, घेतला श्‍वान
श्‍वान पाळणे अतिशय जबाबदारीचे काम आहे. सामाजिक भान ठेवूनच श्‍वान पाळण्याची गरज आहे. मात्र, अनेकजण ‘आली लहर, घेतला श्‍वान’ याच वर्गवारीत मोडतात. त्यामुळे स्वच्छता, इतरांना होणारा त्रास, याबाबत ते अनभिज्ञ असतात. श्‍वानांना घरांतील शौचालयातही नेणे शक्‍य असल्याबाबत अनेकजण अनभिज्ञ असल्याचेही पुढे आले आहे.
 
नागरिकांत श्‍वानांना घरीच प्रातर्विधी करण्याबाबत जनजागृतीचा अभाव आहे. श्‍वानांना लहानपणापासूनच घरी प्रातर्विधीची सवय लावता येते. जेवण ग्रहण केल्यानंतर श्‍वान लघुशंका करतात. त्यावर एक कागद टाकावा. कागद ते शोषून घेईल. हा कागद बाथरूममध्ये ठेवावा. कागदाच्या गंधाने श्‍वानही तेथेच प्रातर्विधीसाठी जाईल. महिनाभर असे केल्यास श्‍वानांना सवय होईल. नंतर बाथरूम स्वच्छ करून वापरता येते.
- संजय डांगरे, संचालक, डांगरे डॉग ट्रेनिंग सेंटर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com