संचालकांच्या हितासाठी बॅंकेत मेगा भरती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

नागपूर - तब्बल १४ कोटींच्या कर्जाची थकबाकी असताना नागपूर महापालिकेच्या कर्मचारी सहकारी बॅंकेत नव्याने कर्मचाऱ्यांची जंबो भरती केली जात आहे. दोन संचालकांच्या मुलांना शाखा व्यवस्थापक करण्यासाठी हा खटाटोप केला जात आहे. बॅंकेला वाचविण्यासाठी ही भरती तत्काळ रोखावी, अशी मागणी कर्मचारी संघटनेच्या वतीने सहकार विभागाकडे करण्यात आली आहे.

नागपूर - तब्बल १४ कोटींच्या कर्जाची थकबाकी असताना नागपूर महापालिकेच्या कर्मचारी सहकारी बॅंकेत नव्याने कर्मचाऱ्यांची जंबो भरती केली जात आहे. दोन संचालकांच्या मुलांना शाखा व्यवस्थापक करण्यासाठी हा खटाटोप केला जात आहे. बॅंकेला वाचविण्यासाठी ही भरती तत्काळ रोखावी, अशी मागणी कर्मचारी संघटनेच्या वतीने सहकार विभागाकडे करण्यात आली आहे.

पालिकेत सध्या ११७ कर्मचारी कार्यरत आहेत. १४६ कर्मचाऱ्यांचे रोस्टर आहे. याचा फायदा घेऊन नोकर भरती केली जात आहे. काही वर्षांमध्ये सर्व शाखांमध्ये संगणकीकरण झाले. गांधीनगर, नंदनवन व पाचपवारी या शाखा तोट्यात आहेत. कर्मचारी कपात करण्याऐवजी वाढविली जात आहे. बॅंक काही वर्षांपासून ३० लाख रुपये फायद्यात असली, तरी मागील वर्षी पाच लाखांनी उत्पन्न कमी झाले आहे.

नव्याने ३० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्यास मोठ्या प्रमाणात वेतनावर खर्च करावा लागणार आहे. याशिवाय निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे निवृत्तिवेतन, ग्रॅच्युइटी, न उपभोगलेल्या रजेचे वेतन आदी खर्चासाठीसुद्धा तरदूत करावी लाणार आहे. नव्या कर्मचाऱ्यांची कुठलीच गरज नसताना केवळ सग्यासोयऱ्यांना नोकरीत सामावून घेण्यासाठी बॅंकेचाच बळी देण्याचा प्रकार सुरू आहे.

शासनाच्या निर्णयानुसार नोकर भरती करताना अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जमाती, विशेष मागास प्रवर्गातील रिक्त जागा भरण्यास प्राधान्य दिले नाही. याशिवाय अनुकंपा तत्त्वावरील रिक्त जागा नोकर भरती करताना विचारात घेतल्या नाहीत. दिवसेंदिवस महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची संख्या रोडावत चालली आहे. यामुळे बॅंकेचे सभासदही कमी होत चालले आहेत. अनेक वर्षांपासून भागधारकांना फक्त दोनच टक्के डिव्हिडंड दिला जात आहे. अशी परिस्थिती असताना सभासदांचे हित जोपासण्याऐवजी केवळ नोकर भरतीचाच आग्रह धरला जात असल्याने संचालकांच्या हेतूवरच कर्मचाऱ्यांनी तक्रारीत शंका उपस्थित केली आहे.

रामनवमीच्या दिवशी परीक्षा
बॅंकेचे मुख्यालय महालमध्ये असताना ३० कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी २५ मार्चला हिंगणा तालुक्‍यातील इसासनी येथे जी. एच. रायसोनी कॅम्पसमध्ये परीक्षा ठेवली आहे. ३० जागांचे वाटप संचालकांनी आधीच केले आहे. परीक्षेला कमीतकमी उमेदवार यावेत, यासाठी लांबचे परीक्षा केंद्र निवडण्यात आले. तसेच मुद्दामच रामनवमीचा दिवस निवडल्याची चर्चा आहे.

Web Title: marathi news nagpur news recruitment in the bank