माजी मंत्री सतीश चतुर्वेदींच्या कारवाईचा आदेश निघाला?

Satish-Chaturvedi
Satish-Chaturvedi

नागपूर - काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांसोबत पंगा घेणारे माजी पालकमंत्री तसेच शहरातील दबंग नेते सतीश चतुर्वेदी यांच्या निलंबनाचा आदेश निघाल्याची जोरदार चर्चा शहर काँग्रेसमध्ये आहे. शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्याशी संपर्क साधला असताना त्यांनी अद्याप कारवाईचे पत्र प्राप्त झाले नसल्याचे सांगितले. 

माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, शहराध्यक्ष विकास ठाकरे आणि त्यांचे वाद टोकाला गेले होते. महापालिकेच्या निवडणुकीत त्यांच्या समर्थकांना उमेदवारी देण्यात आली नव्हती. याचा राग म्हणून चतुर्वेदी यांच्या समर्थकांनी प्रचारसभेसाठी नागपूरमध्ये आलेले प्रदेशाध्यक्ष अशोक  चव्हाण यांच्यावर शाई फेकली होती. सोबतच व्यासपीठाच्या दिशेने अंडी फेकली होती. यामुळे प्रचंड खळबळ उडाली होती. ज्याने शाई फेकली तो माथाडी कामगार असून चतुर्वेदी यांचा कट्टर समर्थक असल्याचे उघडकीस आले होते.

या घटनेनंतर चतुर्वेदी व मुत्तेमवार विरोधक नेत्यांनी पर्यायी अप्रत्यक्षपणे स्वतंत्रपणे काँग्रेस कमिटीचीच स्थापना केली होती. गांधी जयंतीचा कार्यक्रम असो की इंदिरा गांधी जन्मशताब्दीचा दोन्ही काँग्रेसतर्फे वेगवेगळे कार्यक्रम घेतले जात होते. महापालिकेच्या गटनेतेपदी विकास ठाकरे गटाचे संजय महाकाळकर यांची नियुक्ती प्रदेशच्या  वतीने करण्यात आली होती. असे असताना नगरसेवकांच्या गटाला आपल्याकडे वळवून त्यांची उचलबांगडीसुद्धा केली. त्यांच्याऐवजी तानाजी वनवे यांची विरोधीपक्षनेते नियुक्ती केली. हा वाद न्यायालयात गेला. प्रदेशाध्यक्षांच्या निर्णयाविरोधात जाऊन त्यांनी एकप्रकारे त्यांना खुले आव्हानच दिले होते. यामुळे त्यांच्यावर कारवाई निश्‍चित मानली जात होती. मध्यंतरी प्रदेशाध्यक्षाच्या वतीने पक्षविरोधी कारवाया केल्याने त्यांना नोटीस बजावली होती. प्रदेशाध्यक्ष आणि शहराध्यक्ष विकास ठाकरे प्रभारी आहेत. त्यांना नोटीस देण्याचा अधिकारच नसल्याचे सांगून चतुर्वेदी यांनी नोटीस उत्तरसुद्धा दिले नव्हते.

कारवाई रोखण्यासाठी दिल्लीतही लॉबिंग केले. माजी खासदार गेव्ह  आवारी यांनी राहुल गांधी यांना पत्र पाठवून विलास मुत्तेमवार आणि विकास ठाकरे भाजपची बी टीम असल्याचाही आरोप केला होता. या घडामोडींमुळे त्यांच्यावर निलंबनाच्या कारवाईची  तलवार लटकतच होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com