दहावी प्रवेशपत्रासाठी विद्यार्थ्यांची वणवण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

राज्य शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची परवानगी दिली आहे. मात्र, विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज का जमा केले नाही, विद्यार्थ्यांचे सत्यापनाबाबत आवश्‍यक चौकशी करण्यात येईल.
- अनिल पारधी, विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ.

नागपूर - महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला १ मार्चपासून सुरुवात होत आहे. एक दिवसावर असलेल्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अभ्यास  महत्त्वाचा आहे. मात्र, काही विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रासाठी राज्य शिक्षण मंडळाच्या विभागीय कार्यालयापुढे ताटकळत बसावे लागले. परिणामी त्यांचा अभ्यासाचा वेळ प्रवेशपत्राच्या प्रतीक्षेत गेला.

उमरेड तालुक्‍यातील बोथली येथील छविलदास चौधरी अनुदानित माध्यमिक आश्रमशाळेचे दहावीचे सुमारे २७ विद्यार्थी सिव्हिल लाइन्स येथील विभागीय कार्यालयापुढे बसून प्रवेशपत्राच्या प्रतीक्षेत होते. आश्रमशाळेतील एकूण ४० विद्यार्थ्यांपैकी सोमवारी उशिरापर्यंत शाळेत केवळ १३ विद्यार्थ्यांचेच प्रवेशपत्र मिळाले. त्यामुळे उर्वरित २७ विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रासाठी मंगळवारी संस्थेचे संचालक मुरलीधर धात्रक यांनी शिक्षकांसह मंडळाच्या विभागीय कार्यालयात धाव  घेतली. अधिकाऱ्यांना विनवणी केल्यानंतर दिवसभर विद्यार्थी कार्यालयापुढे फुटपाथवर बसून राहिले. मात्र, वातावरण तापत असल्याचे लक्षात येताच मंडळ अधिकाऱ्यांनी तातडीची बैठक बोलावून विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला.

दावे-प्रतिदावे
अनेक दिवसांपासून संस्थेचा आपसात वाद सुरू आहे. मध्यंतरी आश्रमशाळा बंद करण्याची तयारीही राज्य सरकारने केली होती. मात्र, संस्थेला सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळाल्याचा दावा संचालक धात्रक यांनी केला आहे. डिसेंबर महिन्यात दहावीच्या परीक्षेचे अर्ज भरले. परंतु,  शाळेने आधी सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज भरले. नंतर मुख्याध्यापिकेच्या सांगण्यावरून विद्यार्थ्यांचे  अर्ज रद्द केले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र जारी केले नव्हते, अशी माहिती मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. मात्र, धात्रक यांनी दावा केला की, त्यांनी विलंब शुल्कासह विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज पुन्हा मंडळात जमा केले होते. त्यानंतरही २७ विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र मिळाले नाही.

Web Title: marathi news nagpur news ssc exam hall ticket education