विद्यार्थ्याला पाजले मूत्रमिश्रित द्रव्य

विष्णू पवार
विष्णू पवार

नागपूर - शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहात राहून डॉक्‍टर बनण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या अंगावर मूत्र विसर्जन करून त्याची रॅगिंग घेण्यात आली. एवढ्यावरच हा प्रकार थांबला नाही, तर ढेकूण मारण्याच्या औषधाच्या बाटलीत लघुशंका करून तीही त्याला पाजली.

यामुळे विद्यार्थ्याची प्रकृती अस्वस्थ झाली असून, त्याच्यावर सीताबर्डीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात अजनी पोलिसांची भूमिका संशयास्पद असून, आतापर्यंत साधे बयाणही नोंदविले नाही. 
विष्णू भारत पवार (वय २१, सेलू, जि. परभणी) असे विद्यार्थ्याचे नाव आहे.

विष्णूने ‘सकाळ’ प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, तो हनुमाननगर येथील श्री आयुर्वेद कॉलेजमध्ये बीएएमएसच्या द्वितीय वर्षाला शिकतो. चार महिन्यांपासून या वसतिगृहात राहतो. सोबत त्याच्या खोलीत अन्य तीन विद्यार्थी राहतात. २१ फेब्रुवारीला सायंकाळी विष्णूच्या कॉलेजमध्ये स्नेहसंमेलन होते. त्याच दिवशी सायंकाळी ६ च्या सुमारास वसतिगृहातील एका विद्यार्थ्याचा त्याला फोन आला. ताबडतोब वसतिगृहात येण्यास सांगितले.

विष्णूकडे वाहन नसल्याने रात्री १०.३०च्या सुमारास श्रीनाथ नावाच्या मित्रासह तो वसतिगृहात गेला. त्या वेळी त्याला २०५ क्रमांकाच्या खोलीत काही सीनियर्स विद्यार्थी रॅगिंग घेत असल्याचे समजले. रॅगिंगच्या भीतीपोटी विष्णू वसतिगृहाच्या बाहेरच फिरत होता. मध्यरात्री तो खोलीत उपाशीपोटी जाऊन झोपला.  

विष्णू वसतिगृहात आल्याची माहिती मिळताच अन्य विद्यार्थ्यांनी सीनियर्स बोलावत असल्याचे विष्णूला सांगितले. भीतीपोटी विष्णू २०५ क्रमांकाच्या खोलीत गेला. त्या वेळी तेथे रंजित सरदार, प्रशील उचके, प्रवीण गेडाम, शुभम मडावी, राजू सलामे, देवेंद्र मडावी, तुकाराम बुरकुले यांच्यासह १२ ते १५ विद्यार्थी होते. विष्णूला पाहताच सीनियर्स विद्यार्थी त्याच्यावर तुटून पडले. हातबुक्‍क्‍यांनी त्याला मारहाण केली. काहींनी लाथांनी त्याला बदडले. ‘मी उपाशी आहे. मला मारू नका’, अशी विनवणी विष्णू करीत होता; परंतु रॅगिंग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पाझर फुटला नाही. त्यांनी त्याच्या अंगावर मूत्र विसर्जन केले. नंतर त्याला मूत्र पाजले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी ऑर्गेनिक फॉस्फेट नावाचे विषारी द्रव्य त्याला पाजले. या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी विष्णूला ‘तू पारधी समाजाचा आहेस. तुझ्यावर चोरीची केस दाखल करू. तुला वसतिगृहातून बाहेर काढू’, अशी धमकी देऊन जातिवाचक शिवीगाळदेखील केली. 

या घटनेनंतर विष्णूची प्रकृती खालावली. काही विद्यार्थ्यांनी त्याला मेडिकलमध्ये भरती केले. दुसऱ्या दिवशी दुपारी १२ च्या सुमारास वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी विष्णूची प्रकृती बिघडल्याचे त्याच्या वडिलांना सांगितले. विष्णूच्या वडिलांनी ही माहिती विष्णूची नातेवाईक रेखा काळे यांना दिली. माहिती मिळताच रेखा नागपूरला आल्या. विष्णूची प्रकृती लक्षात घेता त्याला खासगी दवाखान्यात भरती करण्याचा निर्णय घेतला. त्यावर मेडिकलमध्ये हजर असलेल्या विद्यार्थ्यांनी विरोध केला. परंतु, काळे यांनी विष्णूला येथील सीताबर्डी येथील खासगी रुग्णालयात भरती केले.  

अजनी पोलिसांच्या भूमिकेवर संशय 
एका विद्यार्थ्याच्या जीवन-मरणाचा प्रश्‍न उपस्थित झाला असताना अजनी पोलिस केवळ कागदी घोडे नाचविण्यापलीकडे काहीही करीत नाही. या गंभीर घटनेची माहिती अजनी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी खासगी दवाखान्यात जाऊन थातूरमातूर चौकशी केली. मंगळवारी सायंकाळपर्यंत विष्णूचे बयाण घेण्यात आले नव्हते. आदिवासी विभागाने या घटनेची गंभीर दखल घेतली. मंगळवारी प्रकल्प अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांनी विष्णूची भेट घेऊन त्याची तक्रार लिहून घेतल्याची माहिती आहे.

रॅगिंग चालतच राहते...
ज्या वेळी विष्णू वसतिगृहात आला, त्या वेळी वॉर्डन सोनपिंपरे यांनी वसतिगृहात रॅगिंग होते आणि ती गुमान सहन करायची, असे सांगितले होते. तू आपल्या रिस्कवर प्रवेश घे. रॅगिंगबद्दल तक्रार करायची नाही, असाही सल्ला सोनपिंपरेंनी दिला होता. ही माहिती विष्णूने आपल्या वडिलांना दिली होती. परंतु, डॉक्‍टर बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वसतिगृहातील त्रासही सहन करू, असा निश्‍चय करून विष्णूने प्रवेश घेतला होता, असे भारत पवार यांनी सांगितले. 

दर शनिवारी होते मारहाण
कुकडे ले-आउटमधील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहात दर शनिवारी रॅगिंग होते. सीनियर्स असलेले विद्यार्थी २०५ क्रमांकाच्या खोलीत एकत्र येतात. तेथे जुनियर विद्यार्थ्यांना बोलवून त्यांना मारहाण केली जाते. त्यानंतर अनेक घाणेरडे प्रकार विद्यार्थ्यांसोबत केले जातात. यात उठबशा काढणे, सर्वांच्या पाया पडणे, नग्न होऊन नृत्य करायला लावणे, अंगावर मूत्र विसर्जन करणे किंवा पाजणे, हिवाळ्यात थंड पाणी टाकणे असे प्रकार होतात, असे विष्णूने सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com