उन्हाळ्यात पाणवठ्यांवर "हाय अलर्ट'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 मार्च 2018

नागपूर - विदर्भात यंदा पावसाने दडी दिल्याने जंगलात आतापासूनच पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. यामुळे वन्यप्राण्यांसाठीचे नैसर्गिक आणि कृत्रिम पाणवठे स्वच्छ करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उन्हाळ्यात या पाणवठ्यांवर विष प्रयोग होण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात आली असून, तेथे करडी नजर ठेवण्याचे निर्देश वन कर्मचाऱ्यांना दिले आहेत.

विदर्भातील ताडोबा-अंधारी, पेंच, मेळघाट, नवेगाव नागझिरा आणि बोर व्याघ्र प्रकल्पासह अभयारण्यातील वन्यप्राण्यांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. त्यादृष्टीने अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडून नैसर्गिक पाणवठ्यांसह नाले व कृत्रिम तलावांच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी तयारी करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

विदर्भातील गोंदिया व भंडारा जिल्ह्यांत यंदा सर्वाधिक कमी, तर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात 52 टक्केच पाऊस झाला. या प्रकल्पालगतच्या इरई धरणात 36 टक्के जलसाठा असून, दरवर्षी पावसाळ्यात इरई धरण तुडुंब भरलेले असते. मात्र, यंदा पावसाअभावी जलस्तर बराच खाली गेलेला असून, अंधारी नदीतील जलस्तरही कमी झालेला आहे.

पेंच व्याघ्र प्रकल्पातील पाण्याचा साठाही प्रथमच 50 टक्‍क्‍यांनी खाली आला आहे. मध्य प्रदेशात बांधलेल्या चवराई धरणामुळे या वर्षी त्या परिसरात पाणी अडविले. त्याचा फटका तोतलाडोह प्रकल्पाला बसला असून, पाण्याची पातळी घटली आहे. परिणामी जंगलातील पाणीसाठा कमी झाल्याने वन्यप्राण्यांची तहान भागविण्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

पावसाने विदर्भात यंदा दडी दिल्याने वन्यप्राण्यांना पाण्याची टंचाई जाणवणार आहे. यामुळे परिसरातील सर्वच अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पांच्या प्रशासनाला जंगलातील पाण्याच्या स्रोतांकडे विशेष लक्ष द्या आणि करडी नजर ठेवा, अशा सूचना दिल्या आहेत.
- रामबाबू अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक.

Web Title: marathi news nagpur news summer water place high alert