विदर्भात तापमान 'चाळिशी'पार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 मार्च 2018

नागपूर - विदर्भात तापमानाचा पारा वाढत असून, मार्च महिन्यातच तापमानाने अनेक शहरांमध्ये चाळिशी गाठली आहे. बुधवारी सर्वाधिक 40.1 अंश तापमानाची नोंद ब्रह्मपुरी येथे झाली. चंद्रपूर आणि वर्धा येथेही या मोसमातील आतापर्यंतच्या उच्चांकाची नोंद प्रादेशिक हवामान विभागातर्फे करण्यात आली आहे.

नागपूर - विदर्भात तापमानाचा पारा वाढत असून, मार्च महिन्यातच तापमानाने अनेक शहरांमध्ये चाळिशी गाठली आहे. बुधवारी सर्वाधिक 40.1 अंश तापमानाची नोंद ब्रह्मपुरी येथे झाली. चंद्रपूर आणि वर्धा येथेही या मोसमातील आतापर्यंतच्या उच्चांकाची नोंद प्रादेशिक हवामान विभागातर्फे करण्यात आली आहे.

दरवर्षी मार्च महिन्यात विदर्भात पारा चाळिशीच्या खाली असतो. यंदा मात्र मार्च महिन्यातच ब्रह्मपुरी, चंद्रपूर आणि वर्धा येथे पाऱ्याने जोरदार उसळी घेत या मोसमात प्रथमच चाळिशी पार केली. ब्रह्मिपुरीत कमाल तापमान सरासरीपेक्षा तब्बल पाच अंशांनी वाढून 40.1 अंशांचा उच्चांक गाठला. चंद्रपूर आणि वर्धा येथेही 40 अंश तापमानाची नोंद झाली.

नागपुरातही बुधवारी 38.8 अंश सेल्सिअस हा तापमानाचा नवा उच्चांक नोंदविला गेला. अचानक वाढलेल्या तापमानाबद्दल प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक अविनाश ताठे म्हणाले, ""ही उष्णतेची लाट नाही. दरवर्षीच्या तुलनेत यंदाचा उन्हाळा अधिक कडक राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला होता. सध्या मध्य भारतात कोरडे वारे वाहत असल्यामुळे उष्मा वाढला आहे. एप्रिल व मे महिन्यात पारा आणखी वाढणार आहे.

आज वादळी पावसाची शक्‍यता
विदर्भात गुरुवारी वादळी पावसाची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे. अकोला, अमरावतीसह अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्ननेसह हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्‌टा निर्माण झाला असून, त्याचा प्रभाव विदर्भासह मराठवाड्यावरही पडण्याची शक्‍यता आहे.

विदर्भातील आजचे तापमान
(अंश सेल्सिअसमध्ये)
शहर तापमान

ब्रह्मपुरी 40.1
चंद्रपूर 40.0
वर्धा 40.0
अकोला 39.5
नागपूर 38.5
गडचिरोली 38.0
वाशीम 38.0
गोंदिया 37.5
यवतमाळ 37.5
अमरावती 37.2
बुलडाणा 36.5

Web Title: marathi news nagpur news temperature