नागपूर: अजनी रेल्वेस्थानकावर 'महिला राज' 

योगेश बरवड
गुरुवार, 8 मार्च 2018

मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक बृजेश कुमार गुप्ता यांनी छोटेखानी सोहळ्यात रेल्वेस्थानकाची प्रतिकात्मक चावी स्टेशन व्यवस्थापक माधुरी चौधरी यांना प्रदान केली. या घटनाक्रमासोबतच भारतीय रेल्वेच्या इतिहासात अजनी रेल्वेस्थानकाचीही नोंद झाली.

नागपूर : उपराजधानीतील अजनी रेल्वेस्थानकाचे संचालन गुरुवारपासून पूर्णपणे महिलांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. जागतिक महिला दिनाच्या पर्वावर मध्य रेल्वेने दिलेली ही गौरवपूर्ण भेट ठरावी. कायमस्वरूपी "महिला राज' असलेले अजनी हे मध्यभारतातील हे पहिले तर देशातील तिसरे रेल्वेस्थानक ठरले आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील इतवारी स्थानकाचे संचालनही आज दिवसभर महिलाच सांभाळत आहेत. 

मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक बृजेश कुमार गुप्ता यांनी छोटेखानी सोहळ्यात रेल्वेस्थानकाची प्रतिकात्मक चावी स्टेशन व्यवस्थापक माधुरी चौधरी यांना प्रदान केली. या घटनाक्रमासोबतच भारतीय रेल्वेच्या इतिहासात अजनी रेल्वेस्थानकाचीही नोंद झाली. माटूंगा व गांधीनगर स्थानकानंतर आता अजनी रेल्वेस्थानकावरही "महिला राज' असणार आहे. या स्थानकावर स्टेशन मास्टर ते सफाई कर्मचारी असे सर्व 36 कर्मचारी महिलाच असणार आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील इतवारी स्थानकाचे संपूर्ण संचालन आज महिलांनीच सांभाळले. 

याशिवाय नागपूर - भुसावळ इंटरसीटी दादाधाम एक्‍स्प्रेसमध्ये नागपूर ते आमला दरम्यान आणि विदर्भ एक्‍स्प्रेसमध्ये नागपूर ते गोंदिया दरम्यान आज पूर्णत: महिला स्फाफ होता. रेल्वेचालक, सहायक, तिकीट निरीक्षक, सुरक्षा रक्षक या सर्वच जबाबदाऱ्या महिलांनीच पार पडल्या. रेल्वे प्रशासनाने महिलाशक्तीचा केलेला हा गौरव समस्त महिलावर्गासाठी प्रेरणादायी आहे.

Web Title: Marathi news Nagpur news womens in Ajani railway station