विद्यापीठात कौशल्यविकासची ऐशीतैशी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

नागपूर  - कौशल्य विकासातून विद्यार्थ्यांना उद्यमशील करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन वर्षांपूर्वी देशातील विद्यापीठ आणि विविध शैक्षणिक संस्थांना आवाहन करून प्रशिक्षण देणारे केंद्र सुरू करण्याचा मानस व्यक्त केला होता. विद्यापीठ अनुदान आयोगाने निर्देशही दिले होते. मात्र, नागपूरसह अनेक विद्यापीठांमध्ये अद्याप कौशल्यविकास केंद्राची सुरुवात झालेली नाही. 

नागपूर  - कौशल्य विकासातून विद्यार्थ्यांना उद्यमशील करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन वर्षांपूर्वी देशातील विद्यापीठ आणि विविध शैक्षणिक संस्थांना आवाहन करून प्रशिक्षण देणारे केंद्र सुरू करण्याचा मानस व्यक्त केला होता. विद्यापीठ अनुदान आयोगाने निर्देशही दिले होते. मात्र, नागपूरसह अनेक विद्यापीठांमध्ये अद्याप कौशल्यविकास केंद्राची सुरुवात झालेली नाही. 

काही वर्षांमध्ये अभियांत्रिकीसह इतर व्यावसायिक व पारंपरिक अभ्यासक्रमांमधून कुठल्याही प्रकारची कौशल्य आत्मसात करता येत नसल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे कंपनीमध्ये कौशल्याअभावी नोकरी मिळत नसल्याचे चित्र दिसून आले. अनेक विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शाखेतून पदवी मिळविल्यानंतरही रोजगार मिळत नाही. त्यांना विविध कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमांद्वारे कंपनीच्या अपेक्षेनुसार प्रशिक्षण देण्याची सोय उपलब्ध करून देण्याची गरज आहे. 

नवनवीन कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम तयार करणे आणि त्याद्वारे प्रशिक्षणाची सोय करून देणे. प्रशिक्षणानंतर विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट करणे यासाठी महाविद्यालयासह विद्यापीठांसारख्या शैक्षणिक संस्थेमध्ये कौशल्यविकास केंद्र उभारण्याचे आदेश केंद्र शासनातर्फे देण्यात आले होते. मात्र, बऱ्याच विद्यापीठांमध्ये हे केंद्र अद्याप सुरू झालेले नाही. 

विद्यापीठात इनोव्हेशन, प्लेसमेंट आणि इतर विद्यार्थी कल्याण मंडळासारखे विविध मंडळे नेमली आहे. मात्र, विद्यापीठातील विद्यार्थ्यांना कौशल्याचे प्रशिक्षण देईल असा एकही विभाग नाही. यामुळे विभागासह विद्यापीठातील संलग्नित महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना कुठल्याच प्रकारचे प्रशिक्षण दिल्या जात नाही, हे विशेष. 

अभ्यासक्रमांना प्रतिसाद मिळेना 
नागपूर विद्यापीठाने विद्यापीठ अनुदान आयोगाकडून आलेल्या विविध आदेशानुसार कौशल्यविकासावर आधारित विविध अभ्यासक्रमांची निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. बरेच प्रमाणपत्र आणि पदविका अभ्यासक्रमांचीही सुरुवात केली आहे. मात्र, विद्यार्थ्यांकडून यापैकी बऱ्याच अभ्यासक्रमांना प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती आहे. 

केंद्राची सुरुवात याचवर्षीपासून 
विद्यापीठाने कौशल्यविकास केंद्र सुरू करण्यासाठी पाऊल उचलले आहे. याच वर्षी त्याची सुरुवात करण्यात येणार आहे. यासाठी विद्यापीठाच्या इनोव्हेशन सेंटरकडे जबाबदारी देण्यात येणार आहे. 
- डॉ. प्रमोद येवले, प्र-कुलगुरू 

Web Title: marathi news nagpur university skill development