कर्णबधिर नीरव ऐकू लागला 

कर्णबधिर नीरव ऐकू लागला 

नागपूर - चार वर्षांचा नीरव. दुडुदुडु धावायचा. परंतु आवाज दिला तरी त्याचे लक्ष राहत नसे. कुटुंबांची बिकट आर्थिक परिस्थिती. आई-वडील मजूर. खस्ता खात आणि हालअपेष्टा सोसत कुटुंब चालवितात. घरात अठराविश्‍वे दारिद्य्र. अशातच नीरवला ऐकूच येत नसल्याचे माहीत झाले. वडिलांच्या महिन्याच्या पगारात त्याचे उपचार करणे शक्‍य नव्हते. नियोजन करून कसाबसा घरखर्च पुरा होतो. मात्र अशातच सरकारी लाभातून चिमुकल्यावर शस्त्रक्रिया झाली. वोक्‍हार्ट हॉस्पिटलने चिमुकल्या नीरववर कॉकलिअर इम्प्लांटच्या माध्यमातून त्याला ऐकण्याची संधी उपलब्ध करून दिली. आईवडिलांनी छातीशी कवटाळून बेटा म्हटले. लगेच त्याने आईकडे बघितले. त्या क्षणी आईवडिलांचे डोळे पाणावले. डॉक्‍टरांचे आभार मानले. सोमवारी चिमुकला नीरव आईवडिलांसोबत घरी गेला. 

नीरव सावनेर येथे राहतो. आईवडील मोलमजुरी करतात. चार वर्षे हातवाऱ्यांच्या भाषेनेच चिमुकल्याची भूक-तहान भागवली. यापुढेही  आयुष्यभर आपले बाळ बोलणार नाही, हे कुटुंबाने ठरवून घेतले होते. मात्र नियतीच मदतीला धावून आली. सावनेरच्या एका व्यक्तीने केंद्र शासनाच्या योजनेतून मदत होईल, अशी माहिती दिली. त्यांनीच वोक्‍हार्ट रुग्णालयात तपासणी केली. डॉ. श्‍वेता लोहिया, पद्मश्री डॉ. मिलिंद किर्तने यांनी या चिमुकल्यावर कॉकलिअर इम्प्लांटचा पर्याय सुचविला. त्यानुसार शल्यक्रिया पार पडली. नीरव आता ऐकू लागला. डॉ. आशीष दिसावाल यांच्या मार्गदर्शनातून अक्षरांची ओळख होत आहे.  आता नीरव बोलू लागेल. या आनंदाने नीरवच्या आईवडिलांचा ऊर भरून आला. मुलाचे भविष्य बरे होईल, या भावनेने हे कुटुंब सुखावले. 

बापाप्रमाणे उशिराच बोलेल  
मूल वाढू लागले. बोलत नसल्याने गैरसमजातून चर्चा सुरू झाल्या. नीरवही बापाप्रमाणे उशिराच बोलेल, यात दोन वर्षे निघून गेली. मात्र आवाजाला प्रतिसाद मिळत नसल्याने शंका आली. मूल कर्णदोष घेऊन जन्माला आल्याचे निदान डॉक्‍टरांनी केले. उपचारासाठी किमान आठ लाखांचा खर्च. सावनेरातील एक व्यक्ती देवदूतासारखी धावून आली. त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून ते वोक्‍हार्ट रुग्णालयात पोहोचले. वोक्‍हार्टने मुंबईतील अली यावर जंग इन्स्टिट्यूटशी संपर्क साधला. इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या ‘ॲडिप’ योजनेतून चिमुकल्या नीरववर झालेल्या कॉकलिअर इम्प्लांटचा खर्च उचलला. पुढील दोन वर्षे कॉकलिअर इम्प्लांटचा पाठपुरावा वोक्‍हार्ट रुग्णालय करेल. 

कर्णदोष घेऊन जन्माला येणाऱ्या १० मुलांपैकी ७ मुलांचा कर्णदोष आपोआपच दूर होतो. ती मुले बोलू शकतात. कर्णदोष दूर न झाल्यास आयुष्यभर मूकबधिर म्हणून जगावे लागते. परंतु जन्मतःच कर्णदोषाचे निदान झाल्यास मुले सामान्याप्रमाणे जगू शकतात. यासाठी जन्मतःच कर्णदोषाची चाचणी करून घ्यावी. यासाठी प्रसूतिरोगतज्ज्ञ तसेच बाळरोग तज्ज्ञांकडून अधिक जनजागृती व्हावी. 
-डॉ. श्‍वेता लोहिया, कर्णबधिर रोगतज्ज्ञ, नागपूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com