बोंडअळीग्रस्तांना सरकारने स्वतःच्या खिशातून मदत द्यावी - राजू शेट्टी

Marathi News Raju Shetti Maharashtra Government Farmer
Marathi News Raju Shetti Maharashtra Government Farmer

नागपूर - राज्यात लहान पक्षांनी मोट बांधत तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्न केल्यास त्याला सहकार्य राहील. मात्र, नेतृत्त्वावरून साशंकता निर्माण होऊ नये, म्हणून पुढाकार घेणार नाही, असे स्वाभिमानी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी आज पत्रकारपरिषदेत सांगितले.

बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने स्वतःच्या खिशातून मदत द्यावी अशी मागणी करीत पिक विमा, बियाणे कंपन्यांकडून नुकसानभरपाई मिळाल्यानंतर स्वतःकडे ठेवावी, असा सल्लाही त्यांनी दिला. विदर्भाच्या दौऱ्यावर आलेल्या खासदार शेट्टी यांनी पत्रकार भवनात पत्रकार परिषद घेतली. सद्यस्थितीत सर्वच राजकीय पक्षांपासून समान अंतरावर असल्याचे नमुद करीत त्यांनी मागील सरकारमधील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराविरोधात भाजपसोबत गेल्याचे सांगितले. मात्र, आताच्या सरकारची कामगिरी बघता, यांच्यापेक्षा ते बरे होते, असे म्हणण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले.

या दोघांशिवाय राज्यात इतर लहान पक्षांनी तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्न केल्यास निश्‍चितच सहकार्याची भूमिका राहील. परंतू पुढाकार घेतल्यास कुणाला आवडेल, नाही आवडेल, असे सांगून त्यांनी नेतृत्वावरून वादाची भीती व्यक्त केली. यावेळी त्यांनी दोन दिवसांत विदर्भाचा दौरा केल्याचे सांगितले. त्यांनी कर्जमाफी, बोंडअळी नुकसानग्रस्तांना मदतीवरून त्यांनी सरकारला धारेवर धरले. ऑनलाईन अर्ज भरण्याच्या नावावर राज्य सरकार शेतकऱ्यांच्या भावनेचा खेळखंडोबा करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. दोन वर्षांपूर्वी सोयाबीनसाठी जाहीर केलेल्या दोनशे रुपये मदत अद्याप मिळाली नाही. त्यामुळे बोंडअळीने नुकसानग्रस्त कापूस उत्पादकांना मदतीचा आकडा आकर्षक असला तरी तो कधी भेटणार? याबाबत त्यांनी शंका उपस्थित केली.

बियाणे कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळणार, असे सरकारने सांगितले. परंतु काही कंपन्या न्यायालयात गेल्या. याशिवाय अनेक शेतकऱ्यांनी पिकाचा विमा काढला नाही, त्यांचे काय?, एनडीआरएफकडून निधी मिळणार असल्याचे सांगितले, पण केंद्राची मंजुरी आहे काय? असा सवाल करीत त्यांनी सरकारने स्वतःच्या खिशातून शेतकऱ्यांना मदत द्यावी, त्यानंतर पिक विमा किंवा बियाणे कंपन्यांकडून मिळणारी रक्कम स्वतःकडे ठेवून घ्यावी, असे ते म्हणाले. मोन्सेन्टो आदी कंपन्याचे बियाणे वापरूनही बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. कापसाचे एकरी 15 क्विंटल नुकसान झाले, कंपन्यांकडून 15 क्विंटल कापसाचे नुकसानभरपाई सरकारने वसूल करावी, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी जनआंदोलन करणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी रविकांत तुपकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष देवेंद्र भोयर, जिल्हाध्यक्ष दयाल राऊत आदी उपस्थित होते. 

संसदेत मांडणार अशासकीय ठराव 
शेतकऱ्यांना कर्जमाफीसंबंधातील तसेच उत्पादनाला हमी देण्यासंदर्भात संसदेत अशासकीय ठराव मांडणार असल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांना कर्जमाफी व उत्पादनाला हमी भाव याबाबत कायदा तयार करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडे मदत मागणार आहे. यातून आता राजकीय पक्षांचे शेतकरी प्रेम बेगडी की खरे, हेही कळून चुकेल, असेही ते म्हणाले. यासाठी सूचना आदी मागविण्यात येत आहे. 
 
वेगळ्या विदर्भाला पाठिंबा 
मोठ्या राज्याच्या तुलनेत लहान राज्यांत प्रगतीचा वेग अधिक आहे. त्यामुळे स्वाभिमानी पक्षाचे लहान राज्यांना समर्थन आहे. स्वतंत्र्य तेलंगणालाही पाठिंबा दिला होता. वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीलाही पाठिंबा असून कार्यकर्त्यांची यासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी असल्याचे ते म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com