वऱ्हाडात गारपिटीचा पुन्हा तडाखा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

बुलडाणा / वाशीम : रविवारी झालेल्या गारपिटीचे सर्वेक्षण होत नाही तोच मंगळवारी बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यातील एकूण नऊ तालुक्‍यांना दुपारी चार वाजताच्या सुमारास गारपिटीचा तडाखा बसला. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव, चिखली, मेहकर व बुलडाणा तालुक्‍यातील सुमारे 50 गावांमध्ये या गारपिटीचा तडाखा बसला आहे. वाशीम जिल्ह्यात मालेगाव, रिसोड, मंगरुळपीर, वाशीम व मानोरा तालुक्‍यात लिंबाएवढ्या गारा पडल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. 

चिखली आणि मलकापूर तालुक्‍यातील बहुतांश गावांमध्ये गारपीट झाल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले. रविवारी  शहर आणि तालुक्‍यात झालेल्या तुफान गारपीट आणि वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानाचे शासकीय पातळीवर काही ठिकाणी सर्वेक्षण सुरू झालेले असताना मंगळवारी शहर आणि परिसरात पुन्हा लहान आकारांच्या गारांसह पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या नुकसानात आणखीनच भर पडली आहे. दरम्यान, कॉंग्रेसचे नेते तथा विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी चिखली तालुक्‍यातील गारपीटग्रस्त भागाचा दौरा करून पिकांच्या झालेल्या नुकसानाची पाहणी केली. यामध्ये नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना हेक्‍टरी 50 हजार रुपयांची मदत तातडीने करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

वाशीम जिल्ह्यात दुपारी चार वाजताच्या सुमारास पाच तालुक्‍यांत गारपीट झाली. लिंबाएवढ्या आकाराच्या गारा पडल्याने जिल्ह्यातील अनेक गावांना त्याचा फटका बसला. यात रब्बी पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. महसूल विभागाने जिल्ह्यातील नुकसान झालेल्या पिकांचे सर्वेक्षण सुरू केले आहे.

Web Title: Marathi News Varhad rainfall