भाजीपाला निर्यातीसाठी शेतकरी-निर्यातदार कंपनीत करार

marathi news vidarbha akola agriculture export company tie up
marathi news vidarbha akola agriculture export company tie up

अकाेला - भाजीपाला निर्यात कराराच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक मोठी संधी मिळाली आहे, याचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी दर्जेदार तथा निर्यातक्षम मालाचे उत्पादन करून प्रगती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले.

दर्जेदार भाजीपाला उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या जिल्‍ह्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला आता निर्यात होणार आहे. निर्यातक्षम भाजीपाला उत्पादक आणि नागपूर येथील ‘ईवा एक्स्पोर्ट कंपनी’ यांच्यामध्ये भाजीपाला निर्यात करार झाला. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. लोकशाही सभागृहात आयोजित या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी नरेंद्र टापरे, उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर, सेवानिवृत्त उपविभागीय कृषी अधिकारी अनिल बोंडे, तहसिलदार रवि काळे, रामेश्वर पुरी, कृषितज्ज्ञ निवृत्ती पाटील, ‘ईवा’ कंपनीचे संचालक संदेश धुमाळ, ‘अॅग्रो स्टार’चे अजय क्षीरसागर यांच्यासह उत्पादक शेतकरी उपस्थित होते. जिल्ह्यात यापूर्वी केळी निर्यात सुरू झाली आहे. आता भाजीपाला निर्यातीच्या दृष्टीने मोठे पाऊल पडले आहे, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, जागतिकीकरणाच्या आजच्या युगात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मागे राहू नये. त्यांचा माल परदेशात निर्यात होऊन त्यांना भरघोस नफा मिळावा, याकरीता जिल्हा प्रशासन व ‘अपेडा’ यांनी शेतकऱ्यांना भाजीपाला निर्यात कराराच्या माध्यमातून मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. त्याचा शेतकऱ्यांनी अवश्य लाभ घ्यावा. भविष्यात आपल्या जिल्ह्यातूनही निर्यातदार तयार व्हावेत, अशी अपेक्षाही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्तविक उप-जिल्हाधिकारी अशाेक आमानकर यांनी केले. ‘ईवा’चे संदीप चव्हाण यांनी कराराबाबत माहिती दिली. तर ‘अॅग्रो स्टार’ अजय क्षीरसागर यांनी निर्यातक्षम मालाबाबत मार्गदर्शन केले. ‘ईवा’चे संचालक संदेश धुमाळ आणि उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी या नात्याने संदीप इंगळे यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

तरुण शेतकऱ्यांना मिळणार स्वयंरोजगाराची संधी
स्वत:च्या पायावर उभे राहण्याची जिद्द बाळगणाऱ्या जिल्ह्यातील 500 तरुण शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासन सहकार्य करणार असून त्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा, उत्तम मार्केट मिळावे व मालाचे ब्रॅण्डींग व्हावे. तसेच शेतमाल वाहतुकीसाठी वाहनाकरिता आर्थिक सहकार्य मिळावे, यासाठी त्यांना ‘वावर’ नावाच्या उपक्रमाच्या माध्यमातून एक मोठी संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याकरीता त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात नोंदणी करावी, असे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.

50 एकरात निर्यातक्षम भेंडीचे उत्पादन
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला प्रामुख्याने भेंडी, कारले, दूधीभोपळा आणि मिरची निर्यात होणार आहे. भेंडी निर्यातीच्या दृष्टीने साेमवारी (ता. 11) जिल्हाधिकारी कार्यालयात करार संपन्न झाला. करारात 55 शेतकऱ्यांनी नोंदणी केली. साधारणतः 50 एकरात निर्यातक्षम भेंडी पिकवणार आहे. निर्यातक्षम भेंडीला कंपनीकडून सरासरी 22 रुपये किलोला दर निश्चित करण्यात आला आहे. जिल्ह्यातून दररोज 25 क्विंटल भेंडी निर्यात करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. निर्यातक्षम भेंडी पिकवण्यासाठी ‘अॅग्रो स्टार कंपनी’ तांत्रिक मार्गदर्शन व निविष्ठा पुरविणार आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com