अकोल्यातच होईल आता पशुंची अल्ट्रा सोनोग्राफी 

अनुप ताले 
शुक्रवार, 16 मार्च 2018

बिन भरवशाची शेती आणि वाढलेली महागाई अशात पशुंच्या रोगनिदान, उपचारासाठी हजारोंचा खर्च करावा लागत असल्याने जिल्ह्यातील पशुपालन व दुग्ध व्यवसाय डबघाईस आला आहे.

अकोला - अल्ट्रा सोनोग्राफीद्वारे लहान, मोठ्या पशुंचे अचुक हृदयरोगनिदान तसेच गर्भतपासणी आता अकोल्यात शक्य होणार असून, रक्त, लघवी आणि दुधाची तपासणी अवघ्या दोन मिनटात होणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या अत्याधुनिक यंत्रांची खरेदी प्रक्रिया स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेने सुरू केली असून, लवकरच त्यांचा लाभ येथील पशुपालकांना घेता येणार आहे. 

पशुपालन व दुग्ध व्यवसाय सुरक्षित व वृद्धांगित व्हावा यासाठी शासनस्तरावरून विविध योजना व उपक्रम राज्यभरात राबविले जात आहेत. या दोन्ही व्यवसायाचा केंद्रबिंदू म्हणजे अचुक आणि अल्प कालावधीत पशुरोगनिदान, उपचार आणि मार्गदर्शन. परंतु, अद्यापही अनेक पशुरोगनिदान, उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी अकोल्यासह लगतच्या जिल्ह्यातील पशुपालकांना नागपूर, मुंबई याठिकाणी पाठविले जाते. बिन भरवशाची शेती आणि वाढलेली महागाई अशात पशुंच्या रोगनिदान, उपचारासाठी हजारोंचा खर्च करावा लागत असल्याने जिल्ह्यातील पशुपालन व दुग्ध व्यवसाय डबघाईस आला आहे. परंतु, आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, कोट्यवधी रुपयांचे अद्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत पशुरोगनिदान व उपचाराची यंत्रे येथील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेत उपलब्ध होत आहेत. 

साडेचार कोटींची प्रशासकीय मंजूरात 
स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था अकोला येथे पशुरोगनिदान व उपचारासाठी लागणारी यंत्रे, रुग्णालय आणि प्रयोगशाळेचे प्रशस्त बांधकाम आणि पशुतज्ज्ञांच्या प्रशिक्षणासाठी शासनाकडून साडेचार कोटी रुपयांची प्रशासकीय व वित्त मान्यता 15 डिसेंबर 2017 ला देण्यात आली. त्यानुसार संस्थेने दीड कोटी रुपयांची यंत्रे खरेदीचे कंत्रांट दिलेले असून, मंजूर निधी प्राप्त होताच त्यांची उपलब्ध केली जाणार असल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली. 

यंत्रे व त्यापासून मिळणाऱ्या सुविधा -
* अल्ट्रा सोनोग्राफी मशीन (कलर ड्रॉप्लर) - या मशीनद्वारे लहान व मोठ्या पशुंचे हृदयरोगनिदान व गर्भतपासणी अचुक व अल्पावधीत होईल. 

* ऑटोमेटिक इलेक्ट्रॉनिक मशीन - विविध रोगांचे निदान करण्यासाठी रक्त, सीरम, मुत्र, दूध, लिव्हार फंक्शन, किडणी फंक्शन तपासणी केवळ एक ते दोन मिनिटात होईल. 

* एन्डोस्कोप - अन्ननलीकेतील बिघाड, अल्सर, जखम, तसेच पोटाचे, घशाचे (श्वाशोच्छवास) विकारांचे निदान तत्काळ होईल. 

* लॅप्रोस्कोपिक यंत्र - कुत्रा, मांजर, शेळी, मेंढी आदी पशुंमध्ये एकटाक्याची (दुर्बिनीद्वारे) शस्त्रक्रिया मशीनद्वारे अल्पवधीत व अचूक होईल. 

* ऑपथेल्मोस्कोप - पशुंच्या डोळ्यातील विकार, रेटीना, बुब्बुळाचे विकार तत्काळ ओळखले जातील. 

* ऑटोस्कोप - कानातील आजारांची तपासणी यंत्राद्वारे अचूक व तत्काळ होईल. 

* अॅनास्थेशिया मशीन - मशीनद्वारे पशुंचे बधिरीकरण करून उपचार व शस्त्रक्रिया सुलभ होईल. 

अत्याधुनिक यंत्र, प्रशिक्षण व बांधकामासाठी मिळालेल्या साडेचार कोटींच्या मंजुरातपैकी तुर्तास दीड कोटीचा निधी प्राप्त होणार आहे. त्यानुसार यंत्रांच्या खरेदीची तयारी पूर्ण झाली असून, निधी मिळताच खरेदी केली जाईल. त्यासाठी किमान दोन महिन्याचा कालावधी लागेल, अशी माहिती स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था अकोला येथील चिकित्सालय अधीक्षक डॉ. एस. पी. वाघमारे यांनी दिली. 

Web Title: marathi news vidarbha akola animals ultrasonography