एटीएमची सुरक्षा ‘रामभरोसे’; सुरक्षा रक्षकच नाही

विवेक मेतकर 
शुक्रवार, 16 मार्च 2018

एटीएमसाठीची सुरक्षाव्यवस्था कमी करण्यात आल्याचे एका खासगी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानेही मान्य केले. एटीएमचे सुरक्षारक्षक काढून घेण्यात आले असले, तरी एटीएमची सुरक्षितता कमी झालेली नाही.

अकोला - बॅँकांच्या खातेदारांना हवे तेव्हा पैसे देणारी एटीएम यंत्रणा आता सुरक्षा रक्षकांविना असुरक्षित बनत चालली आहे. सकाळ चमुने रात्री 2 ते 4 दरम्याने केलेल्या पाहणीत शहरातील 56 एटीएमपैकी बहुसंख्य राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांच्या एटीएमची दारे सताड उघडी तर अनेक ठिकाणी सुरक्षा रक्षकच नसल्याचे दिसून आले. एटीएमवर होणाऱ्या खर्चाच्या तुलनेत त्याद्वारे मिळणारे उत्पन्न नगण्य असल्याने खर्चकपातीसाठी बँकांनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे बॅँकांच्या ग्राहकांची सुरक्षा धोक्यात येण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

बँकांच्या खर्चात वाढ
सुरक्षा रक्षकांना द्यावा लागणारा पगार व त्यांच्यासाठी करावी लागणारी व्यवस्था, एटीएमसाठी आवश्यक वातानुकुलित यंत्रणा, सीसीटीव्ही यामुळे बँकांच्या खर्चात वाढ झाली आहे. त्या तुलनेत गेल्या दीड-दोन वर्षात एटीएममधून बँकांना मिळणारे उत्पन्न कमी झाले आहे. त्यामुळे खर्चातून बचत करण्याचा एक भाग म्हणून एटीएमची सुरक्षाव्यवस्था कमी करण्यात आली आहे, असे एका राष्ट्रीयकृत बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

एटीएमसाठीची सुरक्षाव्यवस्था कमी करण्यात आल्याचे एका खासगी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानेही मान्य केले. एटीएमचे सुरक्षारक्षक काढून घेण्यात आले असले, तरी एटीएमची सुरक्षितता कमी झालेली नाही. एटीएम व एटीएम केंद्राचा परिसर सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली आहे. त्याचबरोबर प्रत्येक एटीएममध्ये सुरक्षेसाठी अलार्म व अन्य सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे एटीएम सुरक्षित आहेत, असा दावाही या अधिकाऱ्याने केला.

अनेक एटीएम रात्री शटरडाऊन
गेल्या दीड दोन वर्षांपासून बँकांना एटीएममधून मिळणारे उत्पन्न कमी झाले होते. त्यानंतर बँकांनी मोफत एटीएम व्यवहारांवर मर्यादा आणण्यास सुरुवात केली. अतिरिक्त व्यवहारांवर शुल्क लादण्यात आले. त्यामुळे बँकांनी कमी व्यवहार होणारी एटीएम रात्रीच्या वेळी बंद ठेवणे, काही एटीएम बंद करणे, असे उपाय योजले. काही ठिकाणी सुरक्षारक्षक कमी करण्यात आल्याची माहिती आहे.

नोटाबंदीत गेली नोकरी
नोटाबंदीचा निर्णयानंतर कॅलिब्रेशनच्या नावाखाली बहुसंख्य एटीएम दोन ते तीन आठवडे बंद होती; तसेच त्यानंतर एटीएमवर निर्बंध होते. याच काळात बँकांनी अनेक एटीएम केंद्रांच्या सुरक्षेचे कंत्राटच रद्द केले. त्यामुळे बँकांच्या खर्चात कपात झाली. मात्र, सुरक्षारक्षकांना नोकरी गमवावी लागली आहे.

का दिली होती सुरक्षा?
काही वर्षांपूर्वी अनेक शहरांत एटीएममधून पैसे काढणाऱ्या खातेदारांवर हल्ला करून, जबरदस्त मारहाण करून त्यांचे पैसे चोरल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामधील घटनेचे सीसीटीव्ही फूटेज व्हायरल झाल्यानंतर देशभर याबाबत तीव्र संताप व्यक्त झाला होता. त्यानंतर बँकांनी सर्व एटीएमबाहेर 24*7 सुरक्षारक्षक तैनात करण्याचा निर्णय घेतला. आऊटसोर्सिंगद्वारे खासगी कंत्राटदारांद्वारे दोन किंवा तीन शिफ्टमध्ये सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले.

सुरक्षा रक्षकांची पिळवणूक
स्वतः एटीएम चालवणाऱ्या बॅँकांची संख्या कमी आहे. सुरक्षा रक्षकांची निवड प्रत्येक बॅंक त्यांच्या वेगवेगळ्या धोरणानुसार करीत असते. आऊटसोर्सिंगमध्ये दोन-तीन शिफ्टमध्ये काम करीत मोठ्या प्रमाणा पिळवणूक होत असल्याचे चित्र आहे. आऊटसोर्सिंगमध्ये कंपनी, एटीएम मेंटनंन्स करणारी यंत्रणा आणि बॅंक या तिन वेग-वेगळ्या यंत्रणांमधून हे काम चालते. त्यामुळे हा तिढा वाढत आहे.

एटीएम कार्ड धारक ग्राहक कुणाचा ?
कोणताही एटीएमधारक ग्राहक हा आधी बॅँकींग इंडस्ट्रीचा ग्राहक असतो. नंतर तो त्या बॅँकेचा ग्राहक असतो. त्याला सुरक्षा पुरवणे एकूनच यंत्रणेचे आद्य कर्तव्य आहे.

ग्राहकांना अनेक अडचणी
एटीएममधून पैसे निघत नाही, कार्ड अडकून राहते अशा वेळी रिजर्व बॅंकेच्या निर्णयानुसार काय केले पाहिजे याची माहितीही बऱ्याच ठिकाणी लावलेली नाही. तक्रार कुठे करायची? एटीएम असलेल्या बॅँकेकडे की ज्या बॅंकेचे आपण ग्राहक आहे. त्या बॅँकेकडे तक्रार करायची याची माहितीही ग्राहकांना नसते. यंत्रणेकडून न मिळालेल्या प्रतिसादामुळे ग्राहक दुर्लक्ष करताना दिसतात.

Web Title: marathi news vidarbha akola ATM security gard unavailable