कर्जाला कंटाळून शेतमजूराची आत्महत्या

सचिन शिंदे
गुरुवार, 15 मार्च 2018

'माझ्याकडे एका व्यक्तीचे 25 हजार, 20 हजार, 4 हजार असे एकुण 49 हजार एवढे कर्ज आहे. ते घर विकुन त्यांना परत करण्यात यावे. माझ्या मृत्यू करीता मी कोणालाही जबाबदार धरणार नाही.'

आर्णी - तालुक्यातील शेंदूरसनी येथील शेतमजुराने आज (ता.15) पहाटे 4 च्या सुमारास गळ्यात नायलॉनचा दोर बांधून विहिरीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली.

सविस्तर वृत्त असे, शेंदूरसणी येथे रामचंद्र दत्ता रोडे (वय 45) हा आपल्या पत्नी, मुलांसोबत रहात होता. एक वर्षांपूर्वी मोठ्या मुलीचे लग्न करुन दिले दोन नंबर ची मुलगी दहावीची परिक्षा देत आहे. मुलगा सुद्धा शिक्षण घेत असुन गावातच पतीपत्नी रोजमजुरी करून आपल्या कुटुंबाचा गाडा चालवत होते. यामध्ये मुलीच्या लग्नासाठी व शिक्षणासाठी खाजगी कर्ज घेतले होते. परंतु ते कर्ज वापस करताना अनेक अडचणी येत असल्याने तो वेळेवर वापस करू शकला नाही त्यामुळे त्याच्या मनावर परिणाम झाला. ता. 15 च्या पहाटे 4 वाजता पत्नी मुलांना झोपेतच ठेऊन घरून निघुन गेला. गावाशेजारीच असलेल्या विहिरीत गळ्याला नायलॉनचा दोर बांधून विहिरीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. 

ही घटना सकाळीच ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी आर्णी पोलिस स्टेशनला कळवताच जमादार संजय भारती व गजानन खांदवे यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. त्याचा पंचनामा करतांना त्याने मृत्यू पुर्वी पत्नीच्या नावाने लिहीलेली चिठ्ठी सापडली. त्यामध्ये लिहीले होते की, 'माझ्याकडे एका व्यक्तीचे 25 हजार, 20 हजार, 4 हजार असे एकुण 49 हजार एवढे कर्ज आहे. ते घर विकुन त्यांना परत करण्यात यावे. माझ्या मृत्यू करीता मी कोणालाही जबाबदार धरणार नाही.' असा मजकूर लिहून असल्याचे आढळून आले. पुढील तपास ठाणेदार नंदकुमार पंत यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार संजय भारती करत आहे. 

Web Title: marathi news vidarbha farmer suicide loan