अधिवेशन आणि संमेलन गोंधळाशिवाय अपूर्णच : मुख्यमंत्री फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

वणी : "विधीमंडळाचे अधिवेशन सुरू होताना पहिले दोन दिवस गोंधळच असतो. मात्र त्यानंतर ते सुरळित पार पडत असते. तसेच साहित्य संमेलनांचेही आहे. गोंधळ किंवा वाद झाल्याशिवाय ही संमेलने व्यवस्थित पार पडत नाहीत,' या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवार) साहित्यिकांचा चिमटा काढला. 

यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्‍यात आयोजित विदर्भ साहित्य संघाच्या 66 व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे त्यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. वणीतील विदर्भ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी सुरुवातीला महाकवी सुधाकर गायधनी यांची निवड झाली होती. त्यांना रितसर पत्र देऊन कळविण्यात आले आणि लेखी मंजुरीही मिळविण्यात आली. पण, नंतर सवंगतेचा आरोप करीत सुधाकर गायधनी यांनी अध्यक्षपद नाकारले. त्यानंतर वर्धेतील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे यांची अध्यक्षपदासाठी निवड करण्यात आली.

या वादाचे वारे सर्वदूर पोहोचले, तसे मुख्यमंत्र्यांनाही त्याची माहिती होतीच. भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी त्याचा उल्लेख केला.

अधिवेशनातील गोंधळ आणि संमेलनाच्या निमित्ताने होणारे वाद यात फारसा फरक नसल्याचेच मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे स्पष्ट केले. "अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असो वा कोणतेही साहित्य संमेलन असो, थोडा तरी वाद झाल्याशिवाय गाजत नाहीत. पण, त्यानंतर ही संमेलने अगदी व्यवस्थित पार पडतात. त्याप्रमाणे हे संमेलन देखील आता तीन दिवस सुरळित होईल,' अशी कोटीही मुख्यमंत्र्यांनी केली.

विद्यावाचस्पती प्राचार्य राम शेवाळकर यांची नगरी म्हणून ओळख असलेल्या वणीमध्ये संमेलन असल्यामुळेच उद्‌घाटन सोहळ्याला उपस्थित झाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितले.

Web Title: marathi news Vidarbha News Devendra Fadnavis Marathi Literature