नोटा घेऊन तुमच्या दरात उभा राहू का? - दिवाकर रावते

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

ठरवून केलेले षड्‌यंत्र - दिवाकर रावते
ते माझ्या दौऱ्यातील गाव नव्हते. काही शेतकऱ्यांनी आग्रह केला म्हणून मी त्यांच्यासाठी गेलो होतो. शेतात गेल्यावर एक शेतकरी रडत होता. मी त्याला म्हटले, "रडतोस कशाला? मी तुमचं दुःख बघायला तुमच्यासाठीच आलो आहे, तर काही जणांनी पैसे घेऊन आले का तुम्ही, असे विचारले. त्यावर मी कोण बोलले समोर या, असे म्हटले. गर्दीतील एक जण या सर्व प्रकाराचा व्हिडिओ काढत होता.

वाशीम - राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर अनेक वेळा सत्तेतून बाहेर पडण्याची धमकी देणाऱ्या शिवसेनेचे नेते तथा राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते हे गारपीटग्रस्त भागाची पाहणी करताना शेतकऱ्यांवरच घसरले. ""आता काय तुमच्या दरवाजात नोटा घेऊन उभा राहू?,'' असा प्रश्‍न रिसोड तालुक्‍यातील नेतन्सा येथील शेतकऱ्याला शुक्रवारी केला. यामुळे रावते यांच्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये चीड व्यक्त होत आहे.

वाशीम जिल्ह्यामध्ये सलग तीन दिवस तुफान गारपीट झाली होती. या गारपिटीत गहू, हरभरा व फळपिकांचे अतोनात नुकसान झाले.

कधीकाळी शेतकरी दिंडी काढून शिवसेनेच्या नेतेपदी विराजमान झालेले राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते आज नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले होते. रिसोड तालुक्‍यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना नेतन्सा शिवारातील नुकसानाच्या पाहणीची मागणी केली. लाल दिव्याच्या गाड्यांचा ताफा बांधावर आला.

जमीनदोस्त झालेला गहू दाखवित शेतकऱ्याने हंबरडा फोडला. मात्र, त्याला आधी मंत्री महोदयांनी "चूप रे' म्हणून दमात घेतले. नंतर मदत कधी देणार? अशी शेतकऱ्याने विचारणा केली असता, "नोटा घेऊन तुमच्या दरवाजात उभा राहू का?' असा प्रश्‍न करीत "कोण काय बोलले,' असे धमकावत शेतकऱ्याचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला. या वेळी तालुक्‍यातील शिवसेनेचे पदाधिकारीही अवाक्‌ झाले. दिवाकर रावते यांच्या अशा वर्तनामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. नुकसानीची पाहणी करू नका? मात्र, दमदाटी तरी करू नका, असे शेतकरी म्हणत आहेत.

ठरवून केलेले षड्‌यंत्र - दिवाकर रावते
ते माझ्या दौऱ्यातील गाव नव्हते. काही शेतकऱ्यांनी आग्रह केला म्हणून मी त्यांच्यासाठी गेलो होतो. शेतात गेल्यावर एक शेतकरी रडत होता. मी त्याला म्हटले, "रडतोस कशाला? मी तुमचं दुःख बघायला तुमच्यासाठीच आलो आहे, तर काही जणांनी पैसे घेऊन आले का तुम्ही, असे विचारले. त्यावर मी कोण बोलले समोर या, असे म्हटले. गर्दीतील एक जण या सर्व प्रकाराचा व्हिडिओ काढत होता. मी त्यांना म्हटले, तुम्ही शेतकरी आहात. असे प्रकार करू नका. अशामुळे शेतकऱ्यांची बदनामी होते. मी त्यांना समजावले की मदत अशी मिळते का? नियमानुसार बॅंकेत जमा होते. मी काय तुमच्या दारात नोटा घेऊन येऊ का? असे म्हटले. हा सर्व प्रकार ठरवून केला असून, मी त्याला रोखठोक उत्तर दिल्याचे दिवाकर रावते यांनी सांगितले.

Web Title: marathi news washim news farmer issue Diwakar Raote