92 वे मराठी साहित्य संमेलन यवतमाळात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

नागपूर - अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने 92 वे मराठी साहित्य संमेलन यवतमाळात होणार असल्याची अधिकृत घोषणा आज केली. विदर्भ साहित्य संघाची यवतमाळ शाखा आणि वि. भी. कोलते संशोधन केंद्र व वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन आयोजित करणार आहे. दोन्ही संस्थांच्या निमंत्रणावरून महामंडळाच्या स्थळ निवड समितीने यवतमाळला 5 ऑगस्टला भेट दिली होती.

त्यानंतर समितीचा अहवाल महामंडळाच्या पुढील बैठकीत येऊन घोषणा करण्याची परंपरा आहे; परंतु यवतमाळच्या निमंत्रणाला कुठलीही स्पर्धा नसल्यामुळे स्थळ निवड समितीच्या शिफारशीवर निर्णय घोषित करण्यात आला. संमेलनातील ग्रंथप्रदर्शन व इतर कार्यक्रमांच्या आखणीसाठी 26, 27 व 28 ऑक्‍टोबरला यवतमाळ येथे महामंडळाची बैठक होणार आहे. यात संमेलनाचा सविस्तर कार्यक्रम ठरविण्यासंबंधी चर्चाही होईल. वर्धा आणि यवतमाळ अशा दोन ठिकाणी स्थळ निवड समिती भेट देणार होती. पण, वर्धेने माघार घेतल्याने केवळ यवतमाळचाच पर्याय पुढे होता. त्यानुसार यवतमाळ येथील सावित्रीबाई फुले समाजकार्य महाविद्यालयात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्यासह डॉ. दादा गोरे, डॉ. इंद्रजित ओरके, डॉ. अनुपमा उजगरे, विनोद कुळकर्णी, डॉ. विलास चिंतामण देशपांडे यांनी बैठक घेऊन संपूर्ण आढावा घेतला होता. साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यासाठी संस्था सक्षम असून, स्थळदेखील योग्य असल्याचा अहवाल समितीने दिल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला. 45 वर्षांपूर्वी म्हणजेच 1973 मध्ये ग. दि. माडगूळकर यांच्या अध्यक्षतेत यवतमाळमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते. दरम्यानच्या काळात यवतमाळमधून प्रस्ताव येत राहिले; पण यंदा ही संधी चालून आली.

Web Title: Marathi Sahitya Sammelan in Yavatmal