मराठीच्या शिक्षकांवर "सेमी इंग्लिश'ची भिस्त 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 एप्रिल 2017

नागपूर - नागपूर जिल्ह्यातील शाळांमध्ये तीन वर्षांपूर्वी सेमी इंग्रजी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. मात्र, हा अभ्यासक्रम निव्वळ फार्स ठरत आहे. यासाठी इंग्रजी माध्यमाचे शिक्षक नेमण्याऐवजी मराठी शिक्षकांच्या खांद्यावरच सेमी इंग्रजीचा भार देण्यात आल्याचे दिसून येत आहे. 

नागपूर - नागपूर जिल्ह्यातील शाळांमध्ये तीन वर्षांपूर्वी सेमी इंग्रजी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. मात्र, हा अभ्यासक्रम निव्वळ फार्स ठरत आहे. यासाठी इंग्रजी माध्यमाचे शिक्षक नेमण्याऐवजी मराठी शिक्षकांच्या खांद्यावरच सेमी इंग्रजीचा भार देण्यात आल्याचे दिसून येत आहे. 

जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती उकेश चव्हाण यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजीतून शिक्षण मिळावे यासाठी तीन वर्षांपूर्वीच जिल्ह्यातील 1 हजार 500 शाळांपैकी 1 हजार 300 शाळांमध्ये सेमी इंग्रजी माध्यमातून शिकविण्यात यावे असे आदेश काढले. त्यानंतर या शाळांमध्ये गणित आणि विज्ञान हे विषय सेमी इंग्रजीतून शिकविण्यास सुरुवात झाली. सेमी इंग्रजीसाठी नव्या तज्ज्ञ शिक्षकांची नेमणूक अपेक्षित होती. मात्र, तसे न करता मराठी शिक्षकांच्या खांद्यावरच हा नवा भार टाकण्यात आला. एवढेच नव्हे तर या विषयांची सेमी इंग्रजीतील पुस्तकेही उपलब्ध करून देण्यात आली नाही. त्यामुळे हेही विद्यार्थी मराठीतूनच शिकत आहेत. 

जिल्हा परिषदेकडे नव्या शिक्षकांच्या नेमणुकीसंदर्भात कोणतेही धोरण नाही. विशेष म्हणजे समायोजनात बरेच शिक्षक अतिरिक्त ठरत असताना नव्या नियुक्‍त्या होणार कशा? हा प्रश्‍न आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही. 

प्रशासनाकडून उपेक्षाच 
जिल्हा परिषदेच्या शाळा रिकाम्या असल्याने विद्यार्थी शोधण्यासाठी शिक्षकांना गावोगावी फिरावे लागते. शाळांचे वीजबिल, भाडे आणि शैक्षणिक साहित्याच्या खरेदीसाठी वेळवर पैसे मिळत नाही. त्यासाठीही शिक्षक व मुख्याध्यापकांना प्रशासनाकडे तगादा लावावा लागतो, हे विशेष. 

Web Title: Marathi teachers semi English