नवजात बाळांच्या मृत्यूप्रकरणी डॉक्‍टर पोलिसांच्या ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

डॉ. भूषण कट्टा यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

डॉ. भूषण कट्टा यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
अमरावती - डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रविवारी (ता. 28) रात्री चार नवजात बाळांच्या मृत्यूप्रकरणी अतिदक्षता विभागातील डॉ. भूषण कट्टा यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. डॉ. कट्टा यांना गाडगेनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. अधिष्ठात्यांसह जबाबदार संबंधितांविरुद्ध कारवाई व्हावी; तसेच श्री शिवाजी शिक्षण संस्थेकडून मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी 25 लाख रुपये मदत देण्यात यावी, या मागणीसाठी आमदार रवी राणा यांनी विभागीय आयुक्तांच्या दालनात मंगळवारी ठिय्या आंदोलन केले.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अरुण राऊत यांच्यासह अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉ. बत्रा व डॉ. त्रिदेव यांनी त्यांच्या प्रत्येकी दोन सहकारी डॉक्‍टरांसह तिन्ही मृतदेहांचे सोमवारी (ता. 29) रात्री वैद्यकीय परीक्षण केले; मात्र मृतदेह पालकांनी ताब्यात घेतलेले नव्हते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अरुण राऊत यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी डॉ. भूषण कट्टा यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविला. त्यांनी नवजात बाळांवर उपचारात हयगय केल्याचा ठपका ठेवण्यात आला. आमदार रवी राणा यांसह माजी महापौर विलास इंगोले, सुनील वऱ्हाडे, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे माजी उपाध्यक्ष दिलीप इंगोले आदींनी मंगळवारी सकाळी शवागाराला भेट दिली. याप्रकरणी अधिष्ठात्यांसह विभागाच्या संबंधित सर्व डॉक्‍टरांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात यावा; मृत अर्भकांच्या पालकांना संस्थेकडून प्रत्येकी 25 लाखांची मदत देण्यात यावी, अशी मागणी करीत विभागीय आयुक्तालय गाठले. विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ऍड. अरुण शेळके यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यांनी अधिष्ठाता डॉ. जाणे चर्चेला येतील, असे आयुक्तांना सांगितले. डॉ. जाणे मात्र चर्चेला आलेच नाहीत. आज दुपारी बाळांचे मृतदेह पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

Web Title: maravati vidarbha news