येथून निघतो गांजाचा धूर; कसे काय? 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 डिसेंबर 2019

गोंदिया जिल्ह्यात गांजाची विक्री जोरात सुरू आहे. सालेकसा तालुक्‍यात शवविच्छेदनगृहातून तर अनेक शौकीन गांजाचा धूर काढताना दिसतात. मात्र पोलिस त्यांच्यावर कारवाई करीत नाही. गांजा शौकिनांनी शवविच्छेदनगृहालाच गांजाचा अड्डा बनविला आहे. येथे छुप्या पद्धतीने गांजा ओढला जात आहे. 

सालेकसा (जि. गोंदिया) : सालेकसा तालुक्‍यात गांजा विक्री जोमात सुरू असतानाच शौकिनांनी शहरातील जुन्या शवविच्छेदनगृहाला अमली पदार्थ सेवनाचा अड्डा बनविला आहे. दररोज रात्रीला मोठ्या प्रमाणात तरुणाई शवविच्छेदनगृहात धूर सोडताना दिसत आहेत. असे असले तरी, पोलिस विभाग कारवाई करीत नसल्याने त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 

शौकिनांची संख्या वाढली 

आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त अशी या तालुक्‍याची ओळख आहे. या तालुक्‍यातील बाबाटोली, निंबा, पिपरिया व परिसरातील अन्य गावांत गांजा विक्री कित्येक वर्षांपासून होत आहे. सालेकसा शहरातील गांजा शौकीन तरुणांनी स्मशानभूमी रस्त्यावरील जुन्या शवविच्छेदनगृहालाच आपला अड्डा बनविला आहे. 


सालेकसा : इमारतीतून रात्रीला निघते गांजाचे धूर. 

जीर्ण शवविच्छेदनगहाचा वापर 

एम. बी. पटेल महाविद्यालयाच्यासमोर हे जुने आणि जीर्ण झालेले शवविच्छेदनगृह आहे. रात्रीला तरुणाई या इमारतीचा उपयोग अमली पदार्थ सेवन करण्यासाठी करीत आहेत. सध्या थंडीची चाहूल लागल्याने मोकळ्या ठिकाणी गांजा ओढण्यापेक्षा एका बंदिस्त इमारतीत निवांत बसून गांजाचे सेवन करण्यासाठी जुनी शवविच्छेदनगृहाची इमारत त्यांच्यासाठी सुरक्षिततेची ठरली आहे. 

Image may contain: plant and food

कसं काय बुवा? : प्रेमासाठी वाट्टेल ते, प्रियकराला वाचविण्यासाठी केले असे..
 

कधी होणार कारवाई 

या इमारतीत गांजाच नव्हे, तर विडी, सिगारेट, दारूच्या रिकाम्या बाटल्या आदीही बघायला मिळते. दरम्यान, ही इमारत पाडून अमली पदार्थ सेवनावर आळा घालावा, अवैधरीत्या गांजा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

हेही वाचा की : विदर्भात "हिवसाळा', नववर्षांत वाढणार थंडीचा कडाका
 

इमारत पाडण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची 
ग्रामीण रुग्णालय परिसरात नवीन शवविच्छेदनगृहाचे बांधकाम झाले आहे. हे बांधकाम झाल्यापासून जुन्या इमारतीचा ताबा आम्ही सोडला आहे. आता या इमारतीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. त्यामुळे या विभागाने इमारत पाडण्याची जबाबदारी घ्यावी. 
- श्री. रामटेके, तालुका वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, सालेकसा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marijuana smoke emanates from gondia