लग्नसराईच्या खरेदीला ब्रेक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

नागपूर - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद झाल्याने गेल्या चार दिवसांपासून लग्नसराईच्या खरेदीला ब्रेक लागला. सोने आणि कपडे खरेदी खोळंबली आहे. कार्ड पेमेंटची सुविधा आहे, तेथेच लग्नासाठीची खरेदी केली जात आहे. इतवारी, गांधीबाग बाजारपेठेत जवळपास सर्वच व्यवहार रोखीने होतो. यामुळे ग्रामीण आणि जिल्ह्याबाहेरील लग्नांची खरेदीही सध्या थांबली असून नागरिकांचे हाल होत आहेत. 

नागपूर - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद झाल्याने गेल्या चार दिवसांपासून लग्नसराईच्या खरेदीला ब्रेक लागला. सोने आणि कपडे खरेदी खोळंबली आहे. कार्ड पेमेंटची सुविधा आहे, तेथेच लग्नासाठीची खरेदी केली जात आहे. इतवारी, गांधीबाग बाजारपेठेत जवळपास सर्वच व्यवहार रोखीने होतो. यामुळे ग्रामीण आणि जिल्ह्याबाहेरील लग्नांची खरेदीही सध्या थांबली असून नागरिकांचे हाल होत आहेत. 

तुलसी विवाहानंतर लग्नसराई सुरू होते. साधारणपणे नोव्हेंबरच्या मध्यापासून जूनच्या मध्यापर्यंत लग्नांचा कार्यकाळ असतो. पाचशे-हजारच्या नोटा रद्दच्या निर्णयाचा फटका किरकोळ बाजारपेठेवर झाला आहे. मोठ्या खरेदीही प्रभावित झालेली असून, लग्नसराईच्या खरेदीला याचा सर्वाधिक फटका बसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. कपडा बाजार 80 टक्के प्रभावित झाला आहे. घाऊक बाजार 100 टक्के व्यवहार ठप्प झालेला आहे. 
बॅंका गुरुवारपासून सुरू झाल्या, तरी बॅंकेतून पैसे काढण्यावर मर्यादा आहेत. त्यामुळे लग्नाचा बस्ता खरेदीसाठी कार्ड पेमेंट हाच पर्याय आहे. कार्ड पेमेंटची सुविधा असणारी कापड दुकाने शहरात असली तरी त्याची आकडेवारी कमी आहे. तेथे सध्या थोडीफार गर्दी दिसत आहे. पाचशे-हजारच्या नव्या नोटा उपलब्ध नसल्याने अनेकांनी सोन्याची खरेदीही थांबविली आहे. कापड दुकानांप्रमाणेच सराफा बाजारात मोजक्‍याच ठिकाणी कार्ड पेमेंटची सुविधा आहे. ग्राहकांकडून जुन्याच नोटा घेण्याचा तगादा लागला जात असल्याने व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली आहेत. काहींनी नोटा रद्दचा निर्णय झालेल्या सायंकाळी घाईने सोने खरेदी केली. त्यामुळेही सोन्याचे भाव प्रतितोळा चार ते पाच हजाराने वधारले होते. लग्नसराईत गांधीनगर बाजारपेठेत सर्वाधिक खरेदी होते. नागपूर शहराबरोबरच ग्रामीण भागातील, वर्धा, यवतमाळ आणि गोंदिया, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यातील ग्राहक गांधी बागोतील खरेदीला पसंती देतात. गेल्या चार दिवसांत तेथील बाजारपेठ थंडावली आहे. गांधीबागेतील जवळपास 90 टक्के व्यवहार रोखीने होतात. पाचशे-हजारच्या नोटा चलनातून रद्द झाल्याने गांधीबागेतील गेल्या दोन दिवसांत ग्राहक फिरकलेलेच नाहीत. चार दिवस तेथील घाऊक बाजारातील व्यवहार 100 टक्‍क्‍यांवर ठप्प झाल्याची माहिती गांधीबाग कपडा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजय मदान यांनी सांगितले. 

ग्राहक परत 
पाचशे-हजाराच्या नोटांमुळे अनेक ग्राहक परत जात आहेत. लग्नसराईच्या पार्श्‍वभूमीवर मागणी प्रचंड आहे. पण, चलनात नव्या नोटा नसल्याने व्यवहार ठप्प झाले आहे. कार्ड पेमेंटची सुविधा असली, तरी काही मोजकेच ग्राहक कार्ड पेमेंट करणारे आहेत. ग्रामीण भागातील ग्राहकांकडे डेबिट, क्रेडिट कार्ड नसतात. त्यामुळे ग्राहक हवालदिल झालेला आहे. लग्न समारंभांची खरेदी कशी करावी, अशी चिंता अनेका वधू-वर पित्यांला भेडसावत आहे. 

Web Title: Marriage shopping break