विवाहित प्रेमीयुगुलाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जुलै 2019

घुग्घुस (जि. चंद्रपूर) : विरह सहन न झाल्याने विवाहित प्रेमीयुगुलांनी झाडाला एकत्र गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना पांढरकवडा- शेणगाव मार्गावरील शेतात घडली असून ती आज सकाळी उघडकीस आली.

घुग्घुस (जि. चंद्रपूर) : विरह सहन न झाल्याने विवाहित प्रेमीयुगुलांनी झाडाला एकत्र गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना पांढरकवडा- शेणगाव मार्गावरील शेतात घडली असून ती आज सकाळी उघडकीस आली.
सुनीता अमित निळे (वय 32, रा. नकोडा) आणि राजेश गेडाम (वय 34, रा. पिली, जि. वर्धा) अशी मृतांची नाव आहेत. सुनीता चंद्रपूर जिल्ह्यातील नकोडा येथील रहिवासी आहे. तिचा विवाह अमितशी झाल्यानंतर ती नागपूर येथे राहण्यासाठी गेली. विवाहित राजेश गेडाम हासुद्धा नागपूरला राहत होता. दरम्यान, त्यांचे प्रेमसंबंध जुळले. सुनीताला सहा वर्षांची मुलगी आहे. राजेशलासुद्धा एक मुलगा आणि मुलगी आहे. त्याउपरही त्यांचे प्रेमसंबंध सुरूच होते. सुनीताने तीन वर्षांपूर्वी नागपूर सोडले. ती आणि तिचा पती नकोडा येथे राहायला आले. पती रोजंदारी कामगार होता. या काळात राजेश आणि सुनीता भ्रमणध्वनीवरून एकमेकांशी संपर्कात होते. त्यांच्या भेटीही व्हायच्या, असे सूत्रांनी सांगितले. रविवारी (ता. 14) राजेश चंद्रपुरात आला. त्याने रात्रीच सुनीताशी संपर्क साधला आणि भेटायला बोलावले. पांढरकवडा मार्गावरील एका शेतात ते भेटले. तिथेच त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला. शेतातील एका झाडाला दोरीने दोघांनीही गळफास लावला आणि जीवनयात्रा संपविली. सकाळी ही घटना माहिती झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. घटनास्थळी पोलिस त्वरित पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेतले. रात्रीपासून सुनीता बेपत्ता असल्याने निळे कुटुंब तिचा शोध घेत होते. त्यांना प्रेमीयुगुलाच्या आत्महत्येची बातमी कळल्यानंतर ते तिथे पोहोचले. तेव्हा मृत सुनीताच असल्याची ओळख पटली. पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. मात्र, ही हत्या असू शकते, या दिशेने पोलिस तपास करीत आहे. दोन्ही मृतांचे भ्रमणध्वनी पोलिसांनी जप्त केले आहे. त्यातील संदेशावरून या दोघांचे प्रेमसंबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Married lover's suicide