अपहरणानंतर विवाहितेवर सामूहिक अत्याचार, फेसबुकवरून झाली होती ओळख

संतोष ताकपिरे | Sunday, 8 November 2020

फेसबुकवरून एकमेकांना पाठविलेल्या फ्रेण्ड रिक्वेस्ट त्यांनी स्वीकारल्या. त्यानंतर दोघांमध्ये नियमित चॅटिंग सुरू झाले. चर्चा पुढे वाढत गेली. त्यानंतर महिलेला मदतीची आवश्यकता असल्याचे तिने धीरजला सांगितले.

अमरावती : दुसरीकडे काम मिळवून देतो, असे आमिष दाखवून एका विवाहितेचे अपहरण करून तिघांनी भानखेडा येथील जंगलात सामूहिक अत्याचार केला. फ्रेजरपुरा पोलिसांनी शनिवारी (ता. सहा) रात्री सामूहिक अत्याचार व अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

धीरज रमेश सोळंके (वय ३४), प्रफुल्ल भागवत म्हैसकर (वय २०, दोघेही रा. कोहळा, चांदूररेल्वे) व चेतन प्रवीण खंडार (वय २३, रा. नांदगावखंडेश्वर), अशी अपहरण आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल असलेल्या तिघांची नावे असल्याचे पोलिस निरीक्षक पुंडलिक मेश्राम यांनी सांगितले. तिघांना अधिकाऱ्यांनी आज  न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांना मंगळवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

हेही वाचा - खुशखबर! दिवाळीपूर्वी ४९ हजार शेतकऱ्यांना मिळणार मदत

पीडित महिलेची सात महिन्यांपूर्वी धीरजसोबत ओळख झाली. फेसबुकवरून एकमेकांना पाठविलेल्या फ्रेण्ड रिक्वेस्ट त्यांनी स्वीकारल्या. त्यानंतर दोघांमध्ये नियमित चॅटिंग सुरू झाले. चर्चा पुढे वाढत गेली. त्यानंतर महिलेला मदतीची आवश्यकता असल्याचे तिने धीरजला सांगितले. धीरजने तिला मदत केली. पुन्हा त्यांच्यात भेटीगाठी, चर्चा वाढत गेली. एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत त्यांच्यात मैत्री होती. याच कालावधीत धिरजने पीडितेला भेटीसाठी यशोदानगर चौकात बोलविले. तेथून नवीन काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्याने दुचाकीवर बसवून छत्रीतलाव ते भानखेडा मार्गावर नेले. मार्गात धीरजचे दोन मित्र प्रफुल्ल व चेतन भेटले. तिघेही पीडितेला घेऊन एका शेतातील खोलीत गेले. तेथे तिघांनी आळीपाळीने अत्याचार केला, असा आरोप पीडितेने फ्रेजरपुरा ठाण्यात दाखल तक्रारीत केला. त्याआधारे तिघांविरुद्ध अपहरण व सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून त्यांना पोलिसांनी अटक केली. 

हेही वाचा - Success story : सोशल मीडियावर स्क्रोलिंग करताना सापडला उद्योगाचा मार्ग, आता महिन्याला...

पीडितेने विशद केलेल्या घटनाक्रमानुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. महिला अत्याचाराशी संबंधित घटना असल्याने त्याचा बारकाईने तपास केला जाईल.
-पुंडलिक मेश्राम, पोलिस निरीक्षक, फ्रेजरपुरा ठाणे.