शाळांमधील साहित्य गायब

file photo
file photo


नागपूर  : समग्र शिक्षा अभियानांतर्गत जुन्या, जीर्ण शाळा नवीन तयार करण्यात येत आहेत. गेल्या वर्षभरात दीडशेवर शाळा जमीनदोस्त करण्यात आल्या. पाडण्यात आलेल्या शाळांमधील दरवाजे, खिडक्‍या, डेक्‍स, बेंच व इतर साहित्याबाबत कुठलीही माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण व बांधकाम विभागाला नाही. साहित्याची कर्मचाऱ्यांनी परस्पर विल्हेवाट लावल्याची चर्चा आहे. हे साहित्य लाखोंच्या घरात असल्याचे सांगण्यात येते.
या शाळांचे साहित्य संकलित करून त्याचा स्थानिक ग्रामपंचायतस्तरावर लिलाव होणे आवश्‍यक आहे. स्थानिक ग्रामपंचायतीने त्याची नोंद ठेवून त्याची माहिती पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला देणे बंधनकारक आहे. अशी कुठलीही माहिती देण्यात आली नाही. या साहित्याची परस्पर विल्हेवाट लावण्याची चर्चा आहे. यात दरवाजे, खिडक्‍या, लोखंडी सळई, डेक्‍स, बेंच, कवेलू तसेच दगड, विटांचा समावेश आहे. यातील अर्ध्याअधिक शाळा जुन्या आहेत. त्यासाठी लाकडी सागवानाचा अधिक वापर करण्यात आला. एका शाळेतून दोन ते तीन टन साहित्य निघाल्याचे सांगण्यात येते. 2018-19 वर्षात जवळपास दीडशे जीर्ण शाळा पाडण्यात आल्या. सर्वाधिक आकडा हिंगणा तालुक्‍यातील आहे. तिथे महिनाभरात 16 शाळा भुईसपाट करण्यात आल्या. दुसरा क्रमांक रामटेक तालुक्‍याचा लागतो. हे साहित्य ना पंचायत समितीत आहे, ना जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला पोहोचले. या साहित्याची परस्पर विक्री करून मोठा घोटाळा झाल्याची चर्चा आहे.
साहित्य चोरीला?
साहित्याची माहिती सापडत नसल्याने ते चोरीला गेल्याचा तर्क काहींकडून काढण्यात येत आहे. वर्षभर होत असतानाही त्याची पोलिसांत तक्रार करण्यात आली नाही किंवा बांधकाम व शिक्षण विभागाला देण्यात आली नाही. त्यामुळे या साहित्याची विक्री करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात काही अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याची चौकशी झाल्यास मोठे घबाड सापडेल. त्यामुळे सीईओ यावर काय निर्णय घेतात, याकडेच लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com