महापौर समितीने दोन आरक्षण वगळले

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 September 2019

अमरावती : विकास आराखड्यावरील आक्षेपार्ह मुद्यांवर महापौरांच्या अध्यक्षतेतील बैठक अखेर सोमवारी (ता.9) आटोपली. या बैठकीत मतैक्‍य झाल्याने शांततेत पार पडली. दोन जागांवर विकास आराखड्यात टाकण्यात आलेले आरक्षण वगळण्याची तर एका जागेवरील कायम ठेवण्याची शिफारस महापौर समितीने केली आहे.

अमरावती : विकास आराखड्यावरील आक्षेपार्ह मुद्यांवर महापौरांच्या अध्यक्षतेतील बैठक अखेर सोमवारी (ता.9) आटोपली. या बैठकीत मतैक्‍य झाल्याने शांततेत पार पडली. दोन जागांवर विकास आराखड्यात टाकण्यात आलेले आरक्षण वगळण्याची तर एका जागेवरील कायम ठेवण्याची शिफारस महापौर समितीने केली आहे.
महापौर संजय नरवणे यांच्या अध्यक्षतेत सोमवारी (ता.9) झालेल्या बैठकीस उपमहापौर संध्या टिकले, स्थायी समिती सभापती बाळू भयार, सभागृह नेते सुनील काळे, विरोधी पक्षनेते बबलू शेखावत, विकास आराखडा समितीचे सदस्य चेतन गावंडे, आसमा फिरोज खान, नगररचना विभागाचे सहसंचालक आशीष उईके उपस्थित होते. गत महिन्यात झालेल्या आमसभेत विकास आरखडा मांडण्यात आला. त्यावर सभागृहातील सदस्यांनी आक्षेप घेत सूचना मांडल्यात. त्यावर महापौरांच्या नेतृत्वातील समिती निर्णय करेल, असे सर्वानुमते ठरले होते. त्यानुसार शनिवारी (ता.7) पहिली बैठक झाली. मात्र त्यात मतभेद झाल्याने ती बैठक रद्द करण्यात आली. सोमवारी पुन्हा झालेल्या बैठकीत दोन विषयांवर आलेल्या सूचनांवर विचार करून निर्णय करण्यात आला. साहू बाग येथील खुली जागा साहू समाजास विकासाकरिता देणे व रहाटगाव येथील जमिनीवरील भाजी बाजाराचे आरक्षण हटवून ते निवासीमध्ये रूपांतरीत करण्याची शिफारस शासनाकडे करण्यात आली. जवाहर स्पोर्टींग क्‍लबच्या जागेवर असलेल्या आक्षेपावर या समितीने क्रीडांगणाचे आरक्षण कायम ठेवण्याची शिफारस केली आहे. या जागेवरील क्रीडांगणाचे आरक्षण वगळण्याचा आदेश उच्च न्यायालयांने दिला होता. मात्र तो जुन्या विकास आराखड्यावरील आरक्षणावर होता हे स्पष्ट करण्यात येऊन नवीन आराखड्यातील क्रीडांगण कायम करण्याचा निर्णय समितीने घेतला. आमसभेत 27 ते 28 सूचना आल्या होत्या. त्या सर्व विषयांवर सुनावणी करण्याचा आग्रह होता. मात्र त्यास बराच अवधी लागणार असल्याचे काही सदस्यांचे मत होते. त्यामुळे मोजक्‍या व आवश्‍यक त्याच मुद्यांवर चर्चा करण्यावर मतैक्‍य झाले. तर काही विषयात नियमाने निर्णय करण्याचे अधिकार नसल्याने ते चर्चेतून वगळण्यात आलेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The mayor's committee dropped two reservations