भेट दिलेली बस परत मागितली

भेट दिलेली बस परत मागितली

नागपूर : जनआरोग्य औषधवैद्यकशास्त्र (सामाजिक शास्त्र) विभागातर्फे होणारे लोकोपयोगी संशोधन लक्षात घेता सार्वजनिक आरोग्य विभागाने त्यांच्याकडील एक 25 आसनी बस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेडिकल) भेट दिली. परंतु मेडिकलच्या अधिष्ठाता कार्यालयासमोर ही बस धूळखात ठेवली आहे. या बसचा वापर होत नसल्याने आरोग्य विभाग ही बस पुन्हा ताब्यात घेणार असल्याची माहिती पुढे आली आहे. बस परत करण्यात यावी असे मागणीपत्र त्यांनी मेडिकलला सादर केले असल्याची माहिती आहे. 
शहरी भागातील झोपडपट्टी तसेच गावखेड्यातील दुर्गम मागास भागात आदिवासी पाड्यांवर नागरिकांना होणाऱ्या संसर्ग आजारावरील संशोधनासंदर्भात मेडिकलचा जनआरोग्य औषधवैद्यकशास्त्र पुढे असतो. येथे विद्यार्थ्यांची भेट असते. मेडिकलमध्ये अशा प्रकारचे संशोधन प्रकल्प राबवण्यासाठी, त्या गावाला भेट देण्यासाठी प्रवासी वाहन उपलब्ध नव्हते. अशा प्रकल्पातून आरोग्य विभागालाही लाभ होतो, ही बाब लक्षात घेत सार्वजनिक आरोग्य विभागाने अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्या मागणीवरून बस भेट दिली. आरोग्य विभागाने आहे त्या स्थितीत बस भेट केली. दुरुस्तीची जबाबदारी मेडिकलने स्वीकारली. लाखो रुपयांचा खर्च मेडिकलमध्ये ही बस दाखल होताच, त्यावर दुरुस्तीचा खर्च करण्यात आला. सुरवातीला काही महिने या बसचा वापर झाला. परंतु पुढे या वाहनाच्या इंधनाचा तसेच चालकाचा प्रश्न भेडसावत असल्यामुळे या बसच्या चाकांना थांबा लागला. 
ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू 
आरोग्य उपसंचालक कार्यालयातील काही अधिकाऱ्यांनी विविध कामांसाठी मेडिकल गाठले असता त्यांना हा प्रकार निदर्शनास आला. लाखो रुपये किमतीचे वाहन मेडिकलमध्ये विनावापर पडून असल्यामुळे हे वाहन परत करावे अशी मागणी करत, ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. वाहन परत नेण्याबाबत आक्षेप नोंदवण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या वाहनावरून आरोग्य विभाग आणि मेडिकलमध्ये खटके उडण्याची शक्‍यता आहे. वाहन परत गेल्यास वाहनावर केलेला खर्च पाण्यात जाईल अशीही चर्चा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com