बधिरीकरणाचे इंजेक्‍शन देताच मृत्यू  

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 मार्च 2017

तीन महिन्यातील दुसरे प्रकरण 
२७ डिसेंबर२०१६ रोजी गुडघादुखीवर उपचारासाठी वॉर्ड क्रमांक २३ मध्ये भरती झालेल्या तिशीतील उदय भानुदास मेश्राम याचा मृत्यू झाला होता. यासाठी डॉक्‍टरांचा हलगर्जीपणा  कारणीभूत ठरला होता. त्याच धर्तीवर मेडिकलमध्ये हे दुसरे प्रकरण आहे. 

नागपूर - ऑपरेशन थिऐटरमध्ये मांडीच्या फ्रॅक्‍चरवर शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्‍टरने बधिरीकरणाचे इंजेक्‍शन लावताच, वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मेडिकलमध्ये घडली. महिलेच्या मृत्यूस डॉक्‍टरांचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. 

अस्थिव्यंग विभागाच्या शस्त्रक्रियागारात बधिर करण्याचे इंजेक्‍शन दिल्यानंतर शस्त्रक्रिया करण्याची गरज होती. परंतु, शस्त्रक्रिया न करता एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांसाठी केस स्टडी सुरू असल्याचे सदर महिलेच्या नातेवाइकांनी सांगितले. तुळसाबाई जुमळे (वय ६६, रा. बेलतरोडी) असे मृत महिलेचे नाव आहे. अपघातात जखमी झाल्याने त्यांच्या डाव्या मांडीचे हाड मोडले होते. ११ फेब्रुवारीला त्यांना मेडिकलमध्ये भरती करण्यात आले. सोमवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया सुरू होती. दरम्यान, एकदा भूल देण्यात आली. परंतु, कोणताही परिणाम न झाल्याने स्मायनल कॉर्डमध्ये बधिर करण्याचे इंजेक्‍शन दिले. यावेळी दहा ते बारा बधिरीकरण विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते. इंजेक्‍शन दिल्यानंतर लगेच महिलेची प्रकृती गंभीर झाली. यामुळे तत्काळ अतिदक्षता विभागात हलवले. परंतु, काही वेळातच ती दगावली. 

नातेवाइकांनी शवविच्छेदनाची मागणी केली. डॉक्‍टरांनी ती नाकारली. परंतु, नातेवाइकांच्या आग्रहामुळे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. आज शवविच्छेदन झाले. अंतिम अहवाल तयार करण्यापूर्वी मृताच्या शरीरातील हृदयातील मांसाचे नमुने हिस्टोपॅथॉलॉजीकडे तपासणीसाठी पाठवले. येथील अहवाल आल्यानंतरच अंतिम अहवाल मिळेल, असे सांगण्यात आले. 

अस्थिव्यंग विभागातील मृत्यू प्रकरणाची माहिती मिळाली. उपचारादरम्यान मृत्यू होणे नवीन नाही. खासगीतही अशी प्रकरणे होतात. मेडिकलमध्ये होणाऱ्या मृत्यूचे विश्‍लेषण करण्यासाठी समिती आहे. याशिवाय या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार येईल. 
- डॉ. अभिमन्यू निसवाडे, अधिष्ठाता मेडिकल

या प्रकरणात डॉक्‍टरांची कोणतीही चूक नाही. महिलेस रक्तदाब होता. हृदयविकाराची रुग्ण होती. अतिजोखीम होती. नातेवाइकांना सांगण्यात आले होते. शस्त्रक्रियागारात महिलेस हृदयविकाराचा झटका आला. पहिल्या धक्‍क्‍यातून बाहेर आली; परंतु लगेच दुसरा हृदयविकाराचा धक्का आला. त्या धक्‍क्‍यातून त्या सावरू शकल्या नाहीत.
- डॉ. नरेश तिरपुडे, विभागप्रमुख, बधिरीकरण विभाग, मेडिकल.

तीन महिन्यातील दुसरे प्रकरण 
२७ डिसेंबर२०१६ रोजी गुडघादुखीवर उपचारासाठी वॉर्ड क्रमांक २३ मध्ये भरती झालेल्या तिशीतील उदय भानुदास मेश्राम याचा मृत्यू झाला होता. यासाठी डॉक्‍टरांचा हलगर्जीपणा  कारणीभूत ठरला होता. त्याच धर्तीवर मेडिकलमध्ये हे दुसरे प्रकरण आहे. 

Web Title: Medical college & hospital issue