डॉक्‍टरसाहेब, भरती करून घ्या होऽऽ

Medical-College
Medical-College

नागपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) एक दिवसापूर्वीच केवळ दुसऱ्या युनिटचा रुग्ण असल्याने त्याच्यावर योग्य उपचार झाले नाहीत. अखेर हा रुग्ण मृत्यू पावला. ही घटना ताजी असतानाच बुलडाण्याहून उपचारासाठी आलेले दोन रुग्ण मागील दोन दिवसांपासून डॉक्‍टरांना भरती करून घेण्यासाठी विनवणी करीत आहेत. मात्र डॉक्‍टरांनी त्यांना ताटकळत ठेवले असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अधिष्ठाता कार्यालयात ही माहिती पुढे आली. यानंतर प्रशासनाने रुग्णाला दाखल करत मदतीचा हात दिला.

रवींद्र वाघ आणि हरीभाऊ खंडारे अशी दोन्ही रुग्णांची नावे आहेत. दोघांचे वेगवेगळ्या भागात अपघात झाले होते. यामुळे त्यांच्या पायाचे हाड मोडले आहे. अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात त्यांच्यावर उपचार झाले. पायात ‘रॉड’ टाकून शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र दोघांच्याही पायात या जखमेत जंतुसंसर्ग होत असल्याचे निदान पुढे आले. यामुळे त्यांना मेडिकलमध्ये रेफर करण्यात आले. याप्रसंगी दोघांनीही संबंधित विभागाच्या तज्ज्ञ डॉक्‍टरांसह प्लास्टिक सर्जरी विभागातील तज्ज्ञांकडून उपचाराचाही सल्ला दिला गेला होता. मात्र, दोन दिवसांपासून दोघेही रुग्ण दाखल होण्यासाठी मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागासह आपत्कालीन विभागात खेटा घालीत आहेत. परंतु, त्यांना डॉक्‍टरांकडून दाखल करून घेण्यात आले नाही. यापूर्वी अकोला येथे उपचार घेतले आहेत, त्याच रुग्णालयात परत जाण्याचा सल्ला ते देत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश भुयार यांना कळली. अधिष्ठाता कार्यालयात तक्रार करण्यात आली. यामुळे तातडीने रुग्णांना मदतीचा हात देत उपचारासाठी दाखल करवून घेतले.

वैद्यकीय अधीक्षक कक्ष माहीत नाही 
रुग्णालयीन तक्रारी मेडिकलच्या वैद्यकीय अधीक्षक कक्षात करण्यात येतात. ही माहिती या दोन्ही रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना माहीत नाही. यामुळे थेट अधिष्ठाता कार्यालयात तक्रार करण्यात आली. यावरून वैद्यकीय अधीक्षक कार्यालय तक्रारींपासून दूर असल्याची जोरदार चर्चा येथे सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com