'आधार' असेल तर स्ट्रेचर मिळेल!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मे 2019

परिचरांची २५० पदे रिक्त 
मेडिकलमध्ये ८२२ चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. यापैकी परिचर पदांची सुमारे २५० पदे रिक्त असल्यामुळे स्ट्रेचर ओढण्यासाठी परिचर (अटेन्डट) मिळत नाहीत. बाह्यरुग्ण विभागात सकाळी ९ ते २ या वेळात प्रचंड गर्दी असते. तीन हजारांवर रुग्णांची नोंद होते. कॅज्युल्टीतही हीच स्थिती असते. बाह्यरुग्ण विभाग आणि कॅज्युअल्टीच्या प्रवेशद्वारावर तीन  ते चार अटेन्डटची गरज आहे. मात्र याकडे कोणीही लक्ष देत नाही. एकाच अटेन्डटच्या भरवशावर काम सुरू असते.

नागपूर - मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात गंभीर रुग्णाला तत्काळ स्ट्रेचरवर घेत डॉक्‍टरांकडे पोहोचविण्यासाठी येथे परिचर नसतात. तर स्ट्रेचर कुलूप बंद असतात. नातेवाईक स्ट्रेचरसाठी आरडाओरड करतात. हीच स्थिती कॅज्युअल्टीमध्ये असते. येथे उपस्थित कर्मचाऱ्यांजवळ आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र ठेवल्याशिवाय स्ट्रेचर मिळत नसल्याचे  उघड झाले. 

सोमवार १३ मे रोजी सायंकाळी एक महिला स्वत:ला सांभाळत धापा टाकीत सर्जरीच्या अपघात विभागासमोर आली. प्रसूतीच्या असह्य वेदनांनी विव्हळत होती. पतीने स्ट्रेचरसाठी धाव घेतली. परंतु, स्ट्रेचर मिळाले नाही. सोबत असलेल्या महिलेने डॉक्‍टर-डॉक्‍टर म्हणून आरडाओरड केली, परंतु, त्या वेळात ती महिला प्रसूत झाली. नंतर परिचारिका धावून आल्या. नाळ कापली आणि ट्रेमध्ये बाळाला ठेवले. स्त्रीला वॉर्डात भरती केले. बाळ आणि बाळंत महिला दोघांचीही प्रकृती बरी असल्याचे सांगण्यात आले. 

मेडिकलमध्ये चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्यामुळे रुग्णांची ने-आण करण्यासाठी कर्मचारी उपलब्ध होत नाहीत. यामुळे रुग्णांचे नातेवाईकच स्ट्रेचर ओढतात. नातेवाइकांनी स्ट्रेचर पुन्हा आणून ठेवावे यासाठी आधार किंवा ओळखपत्र ठेवण्यात येते.

Web Title: Medical Hospital Straitcher Patient Aadhar Card ICard