वैद्यकीय अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 ऑगस्ट 2019

नेर (यवतमाळ) : अलीकडच्या काळात नेर ग्रामीण रुग्णालयाची मोठ्या प्रमाणात वाताहत झाली आहे. अनेक समस्यांमुळे रुग्णालयासंदर्भात नागरिकांत मोठ्या प्रमाणात रोष आहे. रुग्णालयासंदर्भात तक्रारींचा पाढा ऐकल्यामुळे खुद्द महसूल मंत्री संजय राठोड यांनी रविवारी (ता.17) रुग्णालयाला भेट दिली. या ठिकाणचा अनागोंदी कारभार पाहून ते स्तंभित राहले. उपस्थित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत खडेबोल सुनावले.

नेर (यवतमाळ) : अलीकडच्या काळात नेर ग्रामीण रुग्णालयाची मोठ्या प्रमाणात वाताहत झाली आहे. अनेक समस्यांमुळे रुग्णालयासंदर्भात नागरिकांत मोठ्या प्रमाणात रोष आहे. रुग्णालयासंदर्भात तक्रारींचा पाढा ऐकल्यामुळे खुद्द महसूल मंत्री संजय राठोड यांनी रविवारी (ता.17) रुग्णालयाला भेट दिली. या ठिकाणचा अनागोंदी कारभार पाहून ते स्तंभित राहले. उपस्थित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत खडेबोल सुनावले.

नेर ग्रामीण रुग्णालयाला अनेक समस्यांनी घेरले आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील गोरगरीब जनतेसाठी एकमेव आशावाद म्हणून या रुग्णालयाकडे पाहल्या जाते. परंतु वरिष्ठांचा वचक संपल्यामुळे रुग्णालयाचा कारभार वाऱ्यावर असून ते अनेक समस्यांचे माहेरघर बनले आहे. दररोज या ठिकाणी तालुक्‍यातील हजारो रुग्ण उपचारासाठी येतात. कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांचे खासगी दवाखाने असल्यामुळे त्यांचे सर्व लक्षणे आपल्या खासगी रुग्णालयाकडे लागले असते. दवाखान्यात अनेकवेळा तर परिचारिकाच रुग्णांची तपासणी करतात. डॉक्‍टर हजर नसणे ही तर नित्याचीच बाब झाली आहे. अत्यवस्थ रुग्ण आल्यास डॉक्‍टरांना फोन करून बोलवावे लागते. संपूर्ण ग्रामीण रुग्णालय जणू आयुषचे अधिकारी व परिचारिकेच्या हवाली केले आहे, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
डॉक्‍टर वेळेवर हजर नसणे, स्वच्छतेचा अभाव, रुग्णांशी असभ्य वागणूक, औषधींचा तुटवडा, लसींचा अभाव, रात्री-बेरात्री विज पुरवठा खंडित झाल्यास जनरेटरही नाही, रात्रीचे वैद्यकीय अधिकारी नसणे, आदी बाबींमुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. या ठिकाणी योग्य उपचार न मिळाल्यामुळे अनेकांना आर्थिक स्थिती नसतानाही खासगीमध्ये जावे लागते. सोबतच साधारण आजारी असलेल्या रुग्णांनाही उठसूट यवतमाळला रेफर करणे ही बाब नित्याचीच झाली आहे.
या सर्व बाबीला कंटाळून अखेर दोन दिवस आधी शिवसेनेचे शहरप्रमुख दीपक आडे यांच्या नेतृत्वात येथील अनागोंदी कारभाराविरोधात निवेदनासह अल्टीमेटम देण्यात आला होता. ग्रामीण रुग्णालयासंदर्भात तक्रारींचा पाढा ऐकल्यामुळे महसूल मंत्री नामदार संजय राठोड यांनी रुग्णालयाला भेट देत गंभीर वास्तव स्वतः पाहिले. यावेळी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना संतप्त महसूलमंत्र्यांनी चांगलेच धारेवर धरले. यापुढे रुग्णांची हेळसांड झाल्यास कठोर कारवाई केल्या जाईल, असा इशाराही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. रुग्णालयाची बारकाईने पाहणी करीत त्यांनी अनेक सूचनाही केल्या. महसूलमंत्र्यांच्या अचानक भेटीमुळे कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली. यावेळी वैद्यकीय अधिकारी खोडवे उपस्थित होते. यावेळी तालुकाप्रमुख मनोज नाल्हे, शहर प्रमुख दीपक आडे, जि प सदस्य भरत मसराम, नगरसेवक शालिक गुल्हाने, शंभू नेवारे, सतीश रायफडे,सतीश शिंदे,सचिन तंबाखे, प्रदीप आडे आदी उपस्थित होते.

रूग्णांची आस्थापूर्वक चौकशी
महसूल मंत्र्यांनी रुग्णालयाला अचानक भेट दिली असता सर्वांनाच आश्‍चर्य वाटले. त्यांनी रुग्णांजवळ जात प्रत्येकाची आस्थेने चौकशी केली. व्यवस्थित उपचार होत आहे की नाही, औषधे दिली जातात की नाही, या सर्व बाबींची रुग्णांना विचारणा केली. एका लहान बालिकेजवळ जात तिच्या आजाराची नीट चौकशी करत मायेचा हात फिरवत धीर दिला. रुग्णांकडून थेट माहिती घेतली तसेच रुग्णालयाची स्वत: पाहणी केली. त्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित डॉक्‍टरांना जाब विचारला, तसेच कारभार सुधारा अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशाराही दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Medical Officers Hail