मेट्रोच्या पुलामुळे मेडिकलची जागा अतिक्रमणाच्या विळख्यात 

file photo
file photo

नागपूर : शहरात मेट्रो रेल्वे प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर मेडिकलच्या मालकीची अजनी येथील तीन एकर जागा अधिग्रहित करण्यात आली. यामुळे येथील वृक्षांची कत्तल केली. मात्र, आता या पुलासभोवतालच्या परिसरात अतिक्रमण होत असल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे मेडिकल प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. 
अजनी येथील मेडिकलच्या मोकळ्या भूखंडात होत असलेल्या अतिक्रमण या विषयावर मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी तातडीने बैठक बोलावली. यात हा विषय पुढे आला. भूखंड हस्तांतरासंदर्भातील कागदपत्रे तपासली असता मेडिकलच्या मालकीची जागा मिळविताना मेट्रो प्रशासनाने दुसऱ्या टप्प्यात सामंजस्य करारही केला नसल्याचे अधिष्ठातांच्या निदर्शनास आले. याबाबत वैद्यकीय शिक्षण विभाग आणि मेट्रो प्रशासनाची भेट घेऊन अधिष्ठातांनी या मुद्यावर कायदेशीर बाबी तपासण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. 
अजनी रेल्वेस्थानकासमोर मेडिकलची सुमारे 11 एकर जागा आहे. मेडिकलमध्ये नोकरी करणारे डॉक्‍टर, परिचारिका, चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची निवासस्थाने आहेत. येथे अतिक्रमण होऊ नये, यामुळे सभोवताल संरक्षित भिंत बांधण्यात आली आहे. मात्र, सरकारच्या सूचनेप्रमाणे मेडिकल प्रशासनाने तीन एकर जागा मेट्रो प्राधिकरणाला दिली. त्यानंतर मेट्रोने या जागेवर उड्डाणपूल बांधला. मात्र, मेट्रोने पुलाखाली बांधलेला रस्ता आणि मेडिकलची जागा या दोघांना विभाजित करणारी कुठलीही संरक्षिक भिंत बांधून दिली नाही. त्यामुळे आता या परिसरात अतिक्रमणांचा विळखा वाढत आहे. मेडिकल प्रशासनासाठी ही डोकेदुखी ठरणार आहे. 
मेट्रो प्रशासनाने पहिल्या टप्प्यात तीन एकर जागा हस्तगत करताना मेडिकलशी करार केला होता. पहिल्या टप्प्यात कर्मचाऱ्यांची नऊ निवासस्थाने पाडली होती. त्या बदल्यात मेट्रोने करारानुसार मेडिकलला निवासी संकुलही उभे करून दिले. मात्र, दुसऱ्या टप्प्यातील एक एकर जागा ताब्यात घेताना मेट्रो आणि मेडिकलमध्ये कुठल्याही प्रकारचा सामंजस्य करार केला गेला नाही. या संदर्भात लवकरच मेट्रोच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन कायदेशीर बाबी तपासली जाणार असल्याचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा बैठकीत म्हणाले. 
असामाजिक तत्त्वांचा सुळसुळाट 
या परिसरात कर्मचाऱ्यांची निवासस्थाने असल्यामुळे परिसर शांत असावा. मात्र, येथे अतिक्रमण वाढल्यास मेडिकल कर्मचाऱ्यांच्या या वसाहतीमध्ये असामाजिक तत्त्वांचा सुळसुळाट पसरेल, अशी भीती कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. यापूर्वी काही रिकामे निवासी गाळे होते, तेथे हाच प्रकार पुढे आला होता, हे विशेष. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com