माडीया भाषेकडून प्रमाणभाषेकडे

पुस्तकातील चित्रांना माडीयामध्ये नावे दिली आहेत.
पुस्तकातील चित्रांना माडीयामध्ये नावे दिली आहेत.

नागपूर : माडीया बोलणाऱ्या आदिवासी मुलांना मराठी समजून घेण्यास, मराठीमध्ये व्यक्त होण्यात अडचण जाते. यामुळे भामरागड आणि आसपासच्या गावांमध्ये शाळा अर्धवट सोडून देण्याचे प्रमाण जास्त आहे. यावर उपाय म्हणून आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांच्याच माडीया भाषेत शिकविण्याचा विचार पुढे आला. यातून राज्यात प्रथमच एका बोलीभाषेतील पुस्तकाची निर्मिती प्रत्यक्षात आली असून माडीया भाषेतील बालभारतीचे पहिल्या वर्गाचे पुस्तक विद्यार्थ्यांच्या हाती आले आहे.
अथक परिश्रमानंतर दुर्गम भागांमध्ये शिक्षणाची गंगा पोहोचली आहे. परंतु, आदिवासीबहुल भागांमध्ये अद्याप भाषेच्या अडचणीमुळे अनेक समस्या आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण होण्यासाठी स्थानिक बोलीभाषेत प्राथमिक शिक्षण द्यावे असे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे. त्यानुसार राज्यात मराठीमध्ये प्राथमिक शिक्षण दिले जाते. आदिवासी मुलांना त्यांची बोलीभाषा आणि शाळेत शिकविली जाणारी प्रमाणभाषा यामध्ये मोठा फरक जाणवत असल्यामुळे ती खुलेपणाने आपले विचार व्यक्त करण्यास असमर्थ ठरतात. ज्ञानकक्षा रुंदावण्यासाठी आणि त्यांना जीवनप्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या आसपास असणाऱ्या वस्तू, झाडे, प्राणी, चित्र यांचा वापर करून ती त्यांच्याच बोलीभाषेत म्हणजे माडीया भाषेत सांगणारे बालभारतीचे पहिल्या वर्गाचे मराठी आणि गणिताचे पुस्तक तयार करण्यात आले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन भामरागड येथे नुकतेच झाले. शालेय शिक्षण विभागाच्या (मंत्रालय) विशेष कार्याधिकारी प्राची साठे, राज्य विज्ञान केंद्राचे संचालक रवींद्र रमतकर यांच्यासह भामरागड तालुक्‍यातील अधिकारी यावेळी उपस्थित होते. गटशिक्षणाधिकारी अश्‍विनी सोनवने आणि स्थानिक शिक्षकांनी परिश्रम घेऊन स्थानिक विद्यार्थ्यांच्या बोली भाषेत या पुस्तकाची निर्मिती केली आहे.
ध्येयाने झपाटले शिक्षकवृंद
विदर्भात आदिवासी मुले आनंदाने शाळेत येतात. परंतु, पाठ्यपुस्तके बघून त्यांना वेगळाच ताण जाणवतो. कारण ज्या संस्कृती आणि बोलीभाषेत जडणघडण झाली आहे त्यापेक्षा वेगळी भाषा व लिपीत त्यांना शिकवले जाते. प्रमाणभाषेतील उदाहरणे आणि चित्र यांच्याशी त्यांचा दुरान्वयेही संबंध आलेला नसतो. यामुळे काही वर्ग पुढे गेले की शिक्षण अर्धवट सोडून दिले जाते. या विद्यार्थ्यांची गळती थांबविण्यासाठी आपल्याला काय करता येईल अशी शिक्षण विभागाने सर्व शिक्षकांना विचारणा केली. त्यावर या विद्यार्थ्यांना माडीया भाषेतून त्यांना रोज दिसणाऱ्या, जाणवणाऱ्या चित्रांमधून, उदाहरणांमधून शिक्षण द्यावे असे ठरले आणि ज्ञानविस्ताराच्या एका वेगळ्या ध्येयाने शिक्षकवृंद झपाटून गेले, असे गटशिक्षणाधिकारी अश्‍विनी सोनोने यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.
अध्ययन व अध्यापनातील अडचणी दूर करणे, आनंददायी शिक्षण मिळावे आणि शैक्षणिक रंजकता यावी. तसेच विद्यार्थ्यांची शिक्षणातील अभिरुची वाढून भाषिक अडसर दूर व्हावा यासाठी आम्ही सर्वांनी मिळून केलेला हा प्रयत्न आहे.
- अश्‍विनी सोनवने, गटशिक्षणाधिकारी, भामरागड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com