राज्यात मेगा पोलिस भरती गरजेची

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 एप्रिल 2019

देशभरातील पोलिस दलात रिक्‍त जागांमध्ये महाराष्ट्र राज्य पोलिस दलाचा तिसरा क्रमांक लागतो. पहिल्या क्रमांकावर बिहार तर दुसऱ्या स्थानी उत्तर प्रदेश असल्याची माहिती पोलिसांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

रिक्‍त जागांमध्ये महाराष्ट्र तिसरा!
नागपूर - देशभरातील पोलिस दलात रिक्‍त जागांमध्ये महाराष्ट्र राज्य पोलिस दलाचा तिसरा क्रमांक लागतो. पहिल्या क्रमांकावर बिहार तर दुसऱ्या स्थानी उत्तर प्रदेश असल्याची माहिती पोलिसांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. महाराष्ट्राची पोलिस दलाची संख्या जवळपास १ लाख ८५ हजार आहे. राज्याला अजून ६० हजारांपेक्षा जास्त पोलिस कर्मचाऱ्यांची गरज असल्याची माहिती पोलिस महासंचालक कार्यालयातील सूत्रांनी दिली. 

महाराष्ट्र पोलिस दलात पाहिजे त्या प्रमाणात पोलिस भरती होत नाही. त्यामुळे मनुष्यबळ कमी आहे. याच कारणामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न ऐरणीवर आला. तसेच पोलिस कर्मचाऱ्यांची वानवा असल्याने योग्य बंदोबस्त वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनाही तैनात करता येत नाही. याच कारणामुळे गुन्हेगारी वाढत आहेत.

 राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्यामुळे चोख बंदोबस्त असणे गरजेचे आहे. मात्र, पोलिस ठाण्यात कमी पोलिस असल्याने बंदोबस्तात चुका होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. पोलिस अधिकाऱ्यांची पदे अद्याप गृहमंत्रालयाने भरली नाही. तसेच अनेकांच्या पदोन्नती थांबवल्याने पोलिस दलात संताप आहे. पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची वानवा असताना गृहमंत्रालयाने पदोन्नत्या रखडवून ठेवल्या. त्याचा परिणाम आगामी निवडणुकांवर होण्याची शक्‍यता आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने घेतली दखल 
मनीष कुमार यांनी २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयात पोलिसांचे प्रश्‍न आणि राज्य सरकारच्या उदासीन धोरणाबद्दल याचिका दाखल केली होती. देशभरात पोलिस दलात रिक्‍त असलेल्या पदांच्या बाबतीत देशातील सर्व उच्च न्यायालयांनी स्वतः जनहित याचिका म्हणून सुनावणी घ्यावी आणि यावर उपाययोजना करण्यासाठी कारवाई करावी, असे आदेश गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत, हे विशेष.

Web Title: Mega police recruitment in the maharashtra state is necessary