मेळघाटचे मुठवा समुदाय केंद्र बनले प्रशिक्षणाचे नवे दालन 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 डिसेंबर 2019

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवर हरिसाल-बोरी-कोठा रोडवर निसर्ग संरक्षण संस्थेद्वारे उभारलेले मुठवा समुदाय केंद्र आता प्रशिक्षणाचे नवे दालन म्हणून उदयास आले आहे. यंदा या केंद्रात तब्बल 600 लोकांची प्रशिक्षण शिबिरे झाली आहेत.

अमरावती : नागपूरच्या वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था म्हणजेच वनामतीतर्फे राज्यभरातील गट "ब'च्या सुमारे 200 परिविक्षाधीन अधिकाऱ्यांसाठी घेण्यात आलेले दोन प्रशिक्षण शिबिरेही मुठवा समुदाय केंद्रातच आयोजित करण्यात आली. त्यानिमित्ताने राज्यातील ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या भावी अधिकाऱ्यांना मेळघाटची सखोल माहिती झाली आहे. 

निसर्ग संरक्षण संस्थेद्वारे 2006 मध्ये मुठवा समुदाय केंद्राची निर्मिती करण्यात आली. मेळघाट व्याघ्रप्रकल्पाच्या सीमेवर हरिसाल-बोरी-कोठा रोडवर संस्थेने हे सुसज्य असे निसर्ग संवाद केंद्र उभारले आहे.

तीन बाजूंनी जंगलाने वेढलेल्या या केंद्राच्या परिसरात पर्यावरणीयदृष्ट्या अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी उभारल्या आहेत. यात एक प्रशस्त खुले सभागृह, तंबूमधून राहण्याची व्यवस्था, निसर्ग ग्रंथालय, भोजनकक्ष, स्वयंपाकघर, शयनशाळा व निसर्ग कुट्या उभारल्या आहेत. 

Image may contain: 2 people, people sitting and crowd
 अमरावती : मुठवा समुदाय केंद्रात प्रशिक्षण घेताना प्रशिक्षणार्थी. 

वन्यजीवांसाठी अभय परिसर 

या संपूर्ण परिसरात चालण्याच्या पाऊलवाटा सोडल्या; तर संपूर्ण परिसरास संरक्षण देण्यात आलेले आहे. त्यामुळे येथे विविध प्रकारच्या वन्य गवत प्रजाती, झाडोरा व वृक्षप्रजाती उभ्या राहिल्या आहेत. निसर्ग संवाद केंद्राच्या बाजूलाच एक सुंदर तलाव आहे. एक आयुर्वेदिक रोपवाटिका व फळबाग वाटिकासुद्धा आहे. मागील 13 वर्षांमध्ये हा परिसर पक्ष्यांसह वन्यजीवांसाठी एक वन्यजीव अभय परिसरसुद्धा बनला आहे. 

हे कसं शक्‍य आहे? वाचा - 'ती'च्या आब्रुला नातेवाईक, परिचितांकडूनच धोका
 

विविध प्रकारचे पक्षी, प्राणी, वनस्पती 

या परिसरामध्ये सुमारे 155 प्रजातींचे पक्षी, 67 प्रकारचे वृक्ष व 230 प्रकारच्या औषधी वनस्पती आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण मुठवा केंद्र विजेमध्ये स्वयंपूर्ण आहे. मुठवा केंद्र स्वतःची वीज स्वतः बनविते. यामध्ये बायोडिझेल, सौरऊर्जा व पवनऊर्जा यांचा केंद्राने सुरेख संगम केला आहे. येथे असलेले कर्मचारी फळबाग, पालेभाज्या व पिके घेण्यासाठी सौरपंपाचा वापर करतात. 

अवश्‍य वाचा  : ते क्रिकेट ट्रॉफी जिंकून भरधाव जात होते, अन्‌ झाले अघटित...

संस्थाध्यक्ष, संस्थापकांचे लक्ष 

मेळघाटची जैवविविधता व वन्यजीवन अभ्यासण्यासाठी मुठवा केंद्रावर दरवर्षी अमरावतीची, शाश्‍वत, अभ्यास, मुंबईची गोदरेज, इंदूरची इंड्‌स अशा अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांनी या खुल्या निसर्ग शाळेत पक्षिनिरीक्षण, जंगल भ्रमण, वन्यजीव सफारी अशा विविध गोष्टींद्वारे पर्यावरण संरक्षणाचे धडे घेतले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. निशिकांत काळे, संस्थापक किशोर रिठे, उपाध्यक्ष अंजली देव, सचिव प्रशांत किरणपुरे, प्रकाश लढ्ढा, विलास श्रीखंडकर, उमाकांत भोयर, डॉ. अनिल आसोले हे या सर्व उपक्रमांवर लक्ष ठेवून असतात. मुठवा समुदाय केंद्रामुळे मेळघाटमधील युवक-युवतींना तसेच कोठा-हरिसाल परिसरामध्ये चांगल्याप्रकारे रोजगार उपलब्ध झाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Melghat Muthawa becomes a new community center for training