मेळघाटातील 217 गावे शिक्षिकांसाठी अनुकूल

सुधीर भारती
शनिवार, 28 जुलै 2018

अमरावती : आदिवासीबहुल मेळघाटातील धारणी व चिखलदरा तसेच अचलपूर तालुक्‍यातील सर्व 217 गावे महिला कर्मचाऱ्यांसाठी अनुकूल करण्यात आली आहेत. त्यामुळे या ठिकाणी रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा भरण्यात येत असून त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. काही वर्षांपासून या गावांवर असलेला प्रतिकूलतेचा शिक्का यानिमित्ताने पुसण्यात आला.

धारणी, चिखलदरा तसेच अचलपूर तालुक्‍यातील एकूण 217 गावे आतापर्यंत महिला शिक्षकांकरिता अनुकूल नसल्याचे कारण दाखविण्यात येत होते. त्यामुळे गेली अनेक वर्षे त्या 217 गावांत शिक्षिकांऐवजी शिक्षकांची बदली केली जात होती. मेळघाटातील काही दुर्गम गावांत वाहतुकीची साधने, संभाषणाची व्यवस्था उपलब्ध नसल्याने महिलांना बदली दिली जात नव्हती. मात्र, आता बहुतांश गावांना पोहोचण्यासाठी एसटी तसेच खासगी वाहनांची व्यवस्था आहे. संपर्काचीही सोय त्या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे आता ही 217 गावे शिक्षिकांसाठी अनुकूल ठरविण्यात आली आहेत. या संदर्भात मुख्य कार्यपालन अधिकारी मनीषा खत्री यांनी पत्रसुद्धा जारी केले. त्यामुळे या 217 गावांत शिक्षिकांच्या बदलीचा मार्ग सुकर झाला आहे. विस्थापित तसेच अतिरिक्त शिक्षिकांची त्या ठिकाणी नियमानुसार बदली केली जाईल.
शिक्षकांचा बॅकलॉग भरणार
मेळघाटातील धारणी तसेच चिखलदरा तालुक्‍यात बदली झाल्यानंतरसुद्धा अनेक शिक्षक रजा टाकून रुजूच होत नव्हते. त्यानंतर राजकीय दबावाचा वापर करून बदल्या रद्द करून घेत. मात्र, आता मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी सक्त पवित्रा घेतला असून विस्थापित तसेच अतिरिक्त झालेल्या अनेकांना मेळघाटातच पाठविण्यात आले. त्यामुळे सहाजिकच मेळघाटातील शिक्षकांचा बॅकलॉग भरून निघणार आहे.

Web Title: melghat news