मेळघाटातील शिक्षक बदल्यांचा घोळ निस्तरेना

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जुलै 2019

अमरावती : जिल्हा परिषदेंतर्गत शिक्षकांच्या करण्यात आलेल्या बदल्यांमधील आरोप प्रत्यारोपांचे गुऱ्हाळ अद्यापही कायम आहे. मेळघाटमध्ये बदली झालेल्या 27 शिक्षकांनी बदली विरोधात न्यायालयात धाव घेतली. अन्य 22 जणांनी न्यायालयाकडून "स्टेटस को' (जैसे थे) चे आदेश प्राप्त केले. पर्यायाने मेळघाटमधील शिक्षणाची यामुळे चांगलीच फरफट होत असल्याचे चित्र समोर आले आहे.

जिल्हा परिषदेने चुकीच्या पद्धतीने केलेल्या पती पत्नी एकत्रीकरणाच्या बदली प्रक्रियेवर शिक्षकांचा आक्षेप आहे. अमरावती जिपमध्ये कार्यरत असणाऱ्या व 100 ते 150 किमी अंतरावर बदली झालेल्या शिक्षकांनी समुपदेशनाला आव्हान दिले आहे. कोणताही विचार न करता पती पत्नी दोघांनाही मेळघाटामध्ये पाठविण्यात आले. विशेष म्हणजे यापैकी बहुतांश शिक्षकांनी यापूर्वीच मेळघाटमध्ये सेवा दिलेली आहे. त्यामुळे तेथून परतण्याचा मार्ग प्रशासनाने बंद केला, असा या शिक्षकांचा आरोप आहे. शाळा सुरू झाल्यानंतर बदलीची प्रक्रिया राबविण्यात आल्याने शिक्षकांच्या पाल्यांच्या शिक्षणाचा मुद्दासुद्धा ऐरणीवर आला आहे. पुढे कोणत्याही संवर्गातून बदली झाली असेल तर त्यांची तीन वर्षापर्यंत बदली करू नये, पती-पत्नी यांचे एकच युनिट पकडून एकाची बदली झाल्यास दुसऱ्या जोडीदाराला त्याला लाभ मिळावा आणि तीन वर्ष एकच युनिट ठेवावे, अशी मागणी शिक्षकांकडून करण्यात आली आहे. या संदर्भात 20 शिक्षकांनी विभागीय आयुक्तांकडेसुद्धा यापूर्वी तक्रार केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी मेळघाटमधील जास्तीत जास्त जागा भरण्याच्या प्रयत्नांची चर्चा जिल्हा परिषदेत झाली होती.
अनिश्‍चिततेची स्थिती
मेळघाटमध्ये बदली झालेले 27 शिक्षक बदलीच्या शाळेवर रुजू जरी झाले असले; तरी त्यांनी सुद्धा न्यायालयात धाव घेतली आहे. जर न्यायालयाकडून स्टेटस को ठेवण्याचे आदेश जारी झाले तर पुन्हा एकदा मेळघाटातील बदलीमध्ये घोळ समोर येणार आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Melghat teacher transit change