आमदारपुत्रांच्या लढाईने गाजणार मेळघाट

नारायण येवले
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

अमरावती : पूर्णतः आदिवासीबहुल मेळघाट विधानसभा मतदारसंघात या वेळी माजी आमदारपुत्रांची उमेदवारीसाठी लढाई सुरू आहे. भाजपने यंदाही हा गड आपल्याकडे राखण्याकरिता प्रयत्न सुरू केले असले, तरी विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्यासाठी फारशी उत्सुकता नाही. नवीन उमेदवाराचा शोध असताना प्रशासकीय अधिकारी रमेश मावस्कर यांचा विचार सुरू आहे. केवलराम काळे व राजकुमार पटेल या परंपरागत प्रतिस्पर्ध्यांसोबत त्यांची लढाई होण्याची शक्‍यता आहे.

विधानसभेच्या स्थापनेपासूनच कॉंग्रेसच्या सातत्यपूर्ण वर्चस्वाला भाजपने 1995 मध्ये सुरुंग लावला. 2009 पर्यंत मेळघाट मतदारसंघ भाजपकडे होता. 2009 मध्ये कॉंग्रेसने पुन्हा हिसकावला. मात्र, 2014 च्या निवडणुकीत मोदी लाटेत तो त्यांना टिकवता आला नाही. भाजपच्या नवख्या प्रभुदास भिलावेकर यांना विजय मिळाला. पाच वर्षांत भिलावेकर यांना या मतदारसंघात छाप पाडता आली नाही. आगामी निवडणुकीसाठी भाजपने नव्या चेहऱ्याचा शोध सुरू केला आहे.
प्रशासकीय अधिकारी रमेश मावस्कर यांच्याभोवती संभाव्य उमेदवार म्हणून भाजपची चर्चा गुंफली आहे. ऑक्‍टोबर 2019 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तीन माजी आमदारपुत्रांमध्ये लढाई होण्याचे संकेत आहेत. दयाराम पटेल यांचे चिरंजीव राजकुमार पटेल, पटले गुरुजी यांचे चिरंजीव व प्रशासकीय अधिकारी रमेश मावस्कर व तू. रू. काळे यांचे चिरंजीव केवलराम काळे हे संभाव्य उमेदवार आहेत. यापैकी रमेश मावस्कर यांचा भाजपकडून विचार सुरू आहे. केवलराम काळे यांनी कॉंग्रेसकडे पुन्हा उमेदवारी मागितली असून, त्यांना या पक्षातून सध्यातरी कुणाकडून आव्हान नाही. राजकुमार पटेल अस्थिर आहेत. लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारांचे समर्थन करणाऱ्या राजकुमार यांची पक्षीय उमेदवारीची मदार खासदार व आमदार राणा दाम्पत्यावर अवलंबली आहे. राष्ट्रवादीची उमेदवारी मिळवून देण्याचे आश्‍वासन त्यांना देण्यात आल्याची चर्चा आहे. आमदारपुत्र व माजी आमदार असलेले उमेदवार रिंगणात येणार असल्याने या मतदारसंघातील निवडणुकीला घराणेशाहीची झालर लागणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेत कॉंग्रेसचे प्राबल्य
विधानसभेत मतदारसंघ काबीज करणाऱ्या भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थेत मात्र वर्चस्व मिळवता आले नाही. चिखलदरा नगर परिषद व धारणी नगरपंचायत कॉंग्रेसच्या ताब्यात आहे. जिल्हा परिषदेच्या दोन्ही तालुक्‍यांतील आठ सर्कलमध्येही कॉंग्रेस व राष्ट्रवादीचा वरचष्मा आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: melghat vidhansabha constituency