मेळघाटातील बुलूमगव्हाण झाले "प्रकाशमान'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

धारणी (जि. अमरावती) ः स्वातंत्र्यकाळापासून प्रतीक्षारत मेळघाटच्या बुलूमगव्हाण गावात आजअखेर विजेचे दिवे लागले. सोबतच राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एसटी बसफेरीसुद्धा सुरू झाली. आता या गावाने महापरिवर्तनाकडे वाटचाल सुरू केली आहे.

धारणी (जि. अमरावती) ः स्वातंत्र्यकाळापासून प्रतीक्षारत मेळघाटच्या बुलूमगव्हाण गावात आजअखेर विजेचे दिवे लागले. सोबतच राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एसटी बसफेरीसुद्धा सुरू झाली. आता या गावाने महापरिवर्तनाकडे वाटचाल सुरू केली आहे.
अमरावती जिल्हा प्रशासन तसेच व्हिलेज सोशल ट्रान्सफार्मेशन फाउंडेशनतर्फे या गावात हा बदल घडविण्यात आला. फाउंडेशनने दत्तक घेतलेल्या एक हजार खेड्यांपैकी बुलूमगव्हाण हे एक खेडे आहे. त्याचे रूपांतरण आता मॉडेल व्हिलेजमध्ये झाले. देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षांनी हे गाव आज विजेने प्रकाशमान झाले. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत आनंद जोशी यांची मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक म्हणून या गावात नियुक्ती करण्यात आली. त्यांच्याच प्रयत्नांतून हा प्रकल्प साकारण्यात आला. गावातील प्रमुख समस्या विजेची होती. जोशी यांनी विद्युत वितरण कंपनी तसेच जिल्हा प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. गावात वीज आल्यानंतर गावकऱ्यांसाठी सार्वजनिक वाहतुकीची सुविधा देणे ही प्रमुख समस्या होती. त्यानुषंगाने पाठपुराव्याला यश येऊन एसटीची "लाल परी' या गावातील नागरिकांच्या सेवेत रुजू झाली. नागरिकांना आज जात प्रमाणपत्रांचे वितरणसुद्धा करण्यात आले. गावातून एसटी बससेवेला प्रारंभ झाला. पालकमंत्री प्रवीण पोटे, आमदार प्रभुदास भिलावेकर, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, धारणीचे विभागीय अधिकारी विजय राठोड आदी उपस्थित होते.
प्रशासन, जनतेच्या सहकार्यामुळे यश
जिल्हाधिकारी अभिजित बांगर, विभागीय अधिकारी विजय राठोड तसेच बुलूमगव्हाण येथील नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हे सर्व शक्‍य झाले, अशी प्रतिक्रिया आनंद जोशी यांनी दिली.

Web Title: Melghat villege news