
वर्धा : लाचखोर ग्रामसेवकासह सदस्याला केली अटक
वर्धा : रमाई घरकुल योजनेचा प्रस्ताव पंचायत समितीत पाठविण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या ग्रामसेवकासह झाडगाव ग्रामपंचायतीच्या सदस्याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई झाडगाव येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आली. ग्रामसवक सचिन भास्कर वैद्य (वय ४१) आणि नरेंद्र वामन संदूरकर( वय ३८) अशी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची नावे असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार सिंदी (मेघे) येथील रहिवासी असून खासगी व्यवसायी आहे. तक्रारदार यांना शासनाच्या रमाई योजनेअंतर्गत घरकुल मंजुरीसाठी नवीन प्रस्ताव वर्धा पंचायत समिती कार्यालयात मंजुरीसाठी पाठविण्याकरिता ग्रामपंचायत झाडगाव (गो.) येथील ग्रामसेवक सचिन भास्कर वैद्य यांनी ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र संदुरकर यांच्या वतीने तक्रारकर्त्याला १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. या प्रकरणी तक्रारकर्त्याने लाचलूचपत विभागात तक्रार नोंदविली.
पोलिस उपअधीक्षक देवराव खंडेराव यांनी प्रकरणाची पडताळणी केली. नरेंद्र संदुरकर यांच्या राहते घरी लाच स्वीकारताना दोन्ही आरोपींना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वर्धाच्या पथकाने रंगेहात अटक केली. सावंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
Web Title: Member Arrested Along With Corrupt Gram Sevak
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..