भयावह : 1945 च्या महामारीच्या आठवणीने येतात अंगावर शहारे; चार-चार मृतदेह पुरले एकाच खड्ड्यात

mahamari.jpg
mahamari.jpg

डोंगरकिन्ही (जि.वाशीम) : 1945 दरम्यान आलेल्या महामारीची भयावहता आठवल्यास अंगावर काटा उभा राहतो. त्यामुळे गावच्या सुरक्षेसाठी पूर्ण ती खबरदारी घेत असल्याचे मत, शेलगाव बोंदाडेच्या 89 वर्षीय महिला सरपंच चंद्रभागामाय वाझूळकर यांनी व्यक्त केले. कोरोनामूक्त शेलगांव बोंदाडे सह ब्राम्हणवाडावासींना सतर्कता बाळण्याचे आवाहन केले आहे.

1945 च्या महामारीबाबत बोलताना चंद्रभागामाय वाझूळकर म्हणाल्या की, त्या आठवणींने आजही अंगावर काटा उभा राहतो. त्यावेळी मी वडील त्र्यंबक लादे यांच्याघरी वसारी या माहेरी होते. प्लेग, कॉलरा, पटकी, मानमोडी आदी आजारांची मोठी लागण होत असे. पायडल पंपाने गावात फवारणी केली जात असे. महामारीची लागण एवढी भयावह होती की, एका-एका बैलगाडीत चार-चार मृतदेह एकाच खड्ड्यांत टाकून माती करावी लागत असे. त्यामुळे संपूर्ण वसारी गाव दूरवर शेतात स्थलांतरीत झाले होते. कित्येक एकरावर दूर दूर लोकांनी बस्तान मांडले होते. 

टिपूर चांदण्याचाच ऊजेड असे. सहा सहा बैलाचा नांगर, गडीमाणसं यांच्यासाठी जात्यावर दळावे लागत असे. मोट नसली तर विहिरीतून शेंदून पाणी काढावे लागत होते. तो काळ गोर्‍या लोकांचा होता. रानावनातील बरबडे भरडून खाण्याची वेळ आली एवढा दुष्काळ होता. ती महामारीची भयावहता अनुभवली आहे. तसेच आता वाशीम जिल्ह्यात मेडशीसारख्या खेड्यातून कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला. त्यामुळे या संसर्गजन्य आजारापासून गावांचा बचाव करण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना केल्या जात आहेत.

प्रवेशद्वारावर नोंदवही
संत ओंकारगीरबाबांचे जन्मस्थळ असल्याने दूरवरून भाविकांची गर्दी रोखण्यासाठी ता. 21 मार्चपासूनच संस्थान बंद केले. अमानी ते रिठद हा 25 किलोमीटरच्या मार्गावर वाघळूद फाटा आहे. तेथे गावाची नाकाबंदी केली. तरी सुद्धा ये-जा करणाऱ्यावर अहोरात्र पाळत ठेवण्यासाठी दोघांची नेमणूक केली. त्या व्यक्तीचे नाव भ्रमणाचे कारण, भ्रमणध्वनी क्रमांक ह्यांच्यासाठी नोंदवही ठेवली.

आरोग्य तपासणीनंतरच गावात प्रवेश
राज्यातून आलेल्या 34 जणांच्या आरोग्य तपासणी पश्‍चात गावप्रवेश दिला. गावात चारच तास किराणा दुकान ऊघडे, ग्राहकाला पूनश्‍च आठवड्यानंतर येण्याबाबत दवंडी पिटवीली. दोनवेळा तिन्ही गावांची सोडीयम हायड्रोक्लोराईडने फवारणी केली. सामाजिक दुरावा पाळून सुभाष वाझूळकर यांच्याकडून राशन वितरण केले. ग्राम पंचायत सचीव गोपाल ईढोळे, सामाजिक कार्यकर्ते नारायण वाझूळकर, पोलिस पाटील भाऊराव वाझुळकर, तंटामुक्ती अध्यक्ष किसन वाझूळकर, रोजगारसेवक विठ्ठल वाझूळकर, शिपाई विलास गवळी हे सुद्धा सतर्कता बाळगत आहेत.

दक्षता समितीचे गठण
गावामध्ये 24 व्यक्तींची दक्षता समिती गठीत केली. यामध्ये 12- 12 जणांचा गट एक दिवस आड आपले कर्तव्य चोख बजावत आहे. गावातील दोन्ही सांजा गोरगरीबांची चूल पेटलीच पाहिजे ही काळजी घेतली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com