#Sunday Special, video : नागभीड नॅरोगेजच्या उरल्या आठवणी 

नरेश शेळके 
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

  • 25 नोव्हेंबरपासून होणार बंद 
  • नागपूर-नागभीड या 109 किलोमीटरच्या ब्रॉडगेज प्रकल्पाला मंजुरी 
  • 1913 मध्ये नागपूर-नागभीड नॅरोगेज ट्रेन सुरू झाली 
  • 2013-14 मध्ये ब्रॉडगेज प्रकल्पला मान्यता 

नागपूर : स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काही वर्षांपर्यंत आर्थिकदृष्ट्या परवडणारे प्रवासाचे साधन आणि प्रवासाच्या इतर सोयी फारशा उपलब्ध नसल्याने नॅरोगेज ट्रेनचे आकर्षणही होते आणि महत्त्वही होते. मात्र, ब्रॉडगेजचे जाळे मजबूत होण्यास सुरुवात झाल्यानंतर आणि प्रवासाचे इतर पर्याय उपलब्ध होऊ लागल्यानंतर अनेक नॅरोगेज मार्ग बंद करण्यात येऊ लागले. मध्य भारतातील नॅरोगेज ट्रेनचे मार्गही यास अपवाद ठरले नाही.

Image may contain: 1 person, standing
ट्रेनमधून डोकावून पाहताना चिमुकली  

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागातील नागपूर-छिंदवाडा-नैनपूर-मंडला-बालाघाट-गोंदिया-चांदा फोर्ट हा मार्ग ब्रॉडगेजमध्ये परावर्तीत करण्यात आला. यापैकी मध्य भारतातील शेवटची नॅरोगेज ट्रेन असलेली इतवारी-नागभीड ही ट्रेन 25 नोव्हेंबरपासून बंद होत असल्याने हा नॅरोगेज मार्ग इतिहास जमा होणार आहे. 

हेही वाचा - जीवनवाहिनीच बंद, आता होणार हाल

नागपूर-नागभीड या 109 किलोमीटरच्या ब्रॉडगेज प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानेच हा मार्ग बंद करण्यात येत आहे. नागपूर-कोलकाता रेल्वे मार्ग सुरू झाल्यानंतर 1908 च्या सुमारास इतवारी स्थानक प्रवाशांसाठी खुले करण्यात आले होते आणि 1913 मध्ये नागपूर-नागभीड नॅरोगेज ट्रेन सुरू झाली. पूर्वी ही ट्रेन नागपूर-नागभीड-वडसा अशी होती. गोंदिया-बल्लारशहा हा मार्ग ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित झाल्यानंतर या ट्रेनचा नॅरोगेज मार्गावरील शेवटचा थांबा नागभीड करण्यात आला. 

Image may contain: one or more people, train, sky and outdoor
रेल्वे स्थानक 

भारावलेले वातावरण आणि उत्सुकता

इतवारी स्थानकावरील फलाट क्रमांक एकवर पावणेदहाच्या सुमारास फारशी वर्दळ नव्हती. फलाट अतिशय चकाचक करण्यात आला होता. त्याचवेळी ब्रॉडगेज मार्गावर गोंदिया-इतवारी पॅसेंजर आल्याने थोडी धावपळ दिसून आली. हळूहळू फलाट क्रमांक एकवर गर्दी वाढू लागली. त्याचवेळी दुसऱ्या बाजून नागभीड-इतवारी नॅरोगेज दाखल झाली. खिडक्‍यांना दही, दुधाच्या कॅन आणि भाजीपाला असलेल्या टोपल्या लटकविलेल्या होत्या.

Image may contain: train, sky and outdoor

काही वेळाने इतवारी-नागभीड ट्रेन फलाटावर दाखल झाली. अगदी वेळेवर ट्रेनने स्थानक सोडले आणि पुढील प्रवासाला रवाना झाली. पुढील प्रत्येक स्थानकावर फलाटावरील प्रवासी मोबाईल घेऊन कुणी फोटो घेत होते, तर कुणी व्हिडिओ काढत होते. सर्वत्र उत्सुकचे वातावरण होते. उमरेड स्थानकावर ट्रेनच्या स्वागतासाठी रांगोळी काढण्यात आली होती. महाव्यवस्थापक गौतम बॅनर्जी आणि विभागीय व्यवस्थापक शोभना बंडोपाध्याय हेसुद्धा प्रवासात असल्याने त्यांचे सर्वत्र स्वागत होत होते. 

Image may contain: 3 people, people sitting and child
ट्रेनमध्ये बसलेले नागरिक 

टेम्पा येथून जंगलातून ट्रेन

कुही आणि उमरेड येथे क्रॉसिंगही पाहायला मिळाले. उमरेड येथे टोकन एक्‍सचेंजही झाले. उमरेडनंतर पवनी आणि पुढे भिवापूर, टेम्पा येथून जंगलातून ट्रेन जात असताना काही प्राणी पाहायला मिळेल, अशी उत्सुकता होती. मात्र, दर्शन काही झाले नाही. अखेर सव्वाचार तासांच्या प्रवासानंतर नागभीड येथे ट्रेन अगदी वेळेवर पोहोचली. स्वागतासाठी स्थानिक रेल्वे समन्वय समितीचे संजय गजपुरे, रेल्वे व्यवस्थापक ए. के. मसराम, नगराध्यक्ष प्रा. उमाजी हिरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ही नॅरोगेज ट्रेन पुन्हा येणार नाही, ही आठवण मनात साठवून या मान्यवरांनी परतीच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. 

 

नॅरोगेज  
इतवारी ते नागभीड 106 किलोमीटर 
सुरुवात 1913 मध्ये 
प्रवासाचा वेळ 4 तास 30 मिनिटे 
डिझेल इंजिन 106 किलोमीटरसाठी 200 लिटर डिझेल 
एकूण डबे सध्या आठ 
एकूण फेऱ्या चार 

 

Image may contain: 1 person, smiling
प्रा. उमाजी हिरे

केंद्र, राज्य सरकार आणि रेल्वे विभागाला धन्यवाद
नॅरोगेज ट्रेन बंद होत असल्याचे दु:ख असले तरी ब्रॉडगेजच्या कामाला सुरुवात होत असल्याचा आनंदही आहे. कारण, यामुळे येथील पर्यटनासाठी जास्तीत जास्त लोक येऊ शकतील. तसेच दक्षिणकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या येथून जाऊ शकेल. त्यामुळे येथील भागातील लोकांना अधिक पर्याय उपलब्ध होतील. ब्रॉडगेजच्या कामाला सुरवात होत असल्याबद्दल केंद्र, राज्य सरकार आणि रेल्वे विभागाला धन्यवाद देतो. 
- प्रा. उमाजी हिरे, 
नगराध्यक्ष, नागभीड.

Image may contain: one or more people and people standing
बिसन नारनवरे

अधिक पैसे मोजावे लागतील 
अख्खं आयुष्य या ट्रेनने प्रवास करण्यात गेलं. गरिबीत जीवन जगत असल्याने काटकसर करण्याची सवय जडली होती. ट्रेन असल्याने कमी पैशात कुही, नागपूर येथे जात होतो. आता कुही, नागपूर येथे जायचे असल्यास अधिक पैसे मोजावे लागतील आणि वेळेचाही अपव्ययही होईल. त्यामुळे चिंता वाढली आहे. 
- बिसन नारनवरे, 
नागरिक, तितूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: memories of Nagbhid Nyarogej