
आम्ही महावितरणकडून आलो आहे, तुमच्या वीज मिटरची तपासणी करायची आहे, अशी बतावणी करून मीटर चेक केले.
आर्णी (जि. यवतमाळ) : महावितरणच्या आर्णी कार्यालयात अभियंता असल्याची बतावणी करून दोन भामट्यांनी एका महिलेची चार हजार रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी गुरुवारी (ता.१०) आर्णी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
येथील लक्ष्मीनारायण नगरातील रहिवासी शबानाबी युसूब खॉं पठाण (वय३८) यांच्या घरी शुक्रवारी (ता.४) मनोज नामदेव खंदारे (वय३५, रा. लोणी) व अतुल गजानन काटोले (वय३०, रा. आर्णी) हे दोघे गेले. आम्ही महावितरणकडून आलो आहे, तुमच्या वीज मिटरची तपासणी करायची आहे, अशी बतावणी करून मीटर चेक केले.
तुमच्या मिटरमध्ये वीज चोरी झाल्याचे सांगून तुम्हाला आता पन्नास हजार रूपये बील येणार असल्याचे म्हटले. ते टाळायचे असल्यास पैशाची मागणी केली. या महिलेने जवळ असलेले चार हजार रूपये दिले. पैसे घेऊन भामटे पसार झाले.
नंतर संशय बळावल्याने वीज ग्राहक शबानाबी युसूब खॉं पठाण यांनी आर्णी उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता नरेंद्र राऊत यांच्याकडे लेखी तक्रार केली. राऊत यांनी संबंधित प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. चौकशीत असे निष्पन्न झाले की, महात्मा फुले वायरमन व औद्योगिक सहकारी संस्था यवतमाळ या एजन्सीकडे मीटर रिडर म्हणून काम करणारे मनोज खंदारे व अतुल काटोले यांनी महावितरणचे अभियंता असल्याची बतावणी करून या महिलेची फसवूणक केली.
त्यामुळे अभियंता संतोष शिवणकर यांनी गुरुवारी (ता.१०) या दोघांविरुद्ध आर्णी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
संपादन - अथर्व महांकाळ