#Good News दर 15 मिनिटांनी मेट्रो 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

  • प्रवाशांसाठी मेट्रोच्या दररोज शंभर फेऱ्या 
  • ताशी 80 च्या वेगाने प्रवास 
  • प्रवाशांना मोठा दिलासा 
  • महामेट्रोने अनेक सेवांमध्ये केले आमूलाग्र बदल 

नागपूर : शहराचा झपाट्याने विकास होत असून, मेट्रो रेल्वेचे काम सर्वठिकाणी हळूहळू पूर्णत्वास येत आहे. खापरी ते सीताबर्डीपर्यंतचे मेट्रोचे काम पूर्ण झाले असून, मेट्रोही सुरू झाली आहे. याचा नागरिक आनंद घेताना दिसून येतात. सुरुवातीला मेट्रोच्या दिवसातून एक दोन फेऱ्याच होत होत्या. आता यात वाढ केल्याने नागरिकांच्या आनंदात वाढ झाली आहे. नागपूरकरांना उत्तम सेवा देण्यासाठी महामेट्रोने आतापर्यंत अनेक सेवांमध्ये आमूलाग्र बदल केले आहेत. 

महामेट्रोने सीताबर्डी इंटरचेंज ते खापरी स्टेशनपर्यंत मेट्रोच्या प्रवासी फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गावर नागरिकांसाठी दर 15 मिनिटांनी प्रवासी सेवा सुरू करण्यात येणार आहे. या मार्गावर ताशी 80 किमी वेगाला सीएमआरएसची मंजुरी मिळाली असून, दर 15 मिनिटांनी मेट्रोची गतिमान प्रवासी सेवा नागरिकांना उपलब्ध होणार आहे. 

क्लिक करा - विदर्भातल्या ताज्या घडामोडींसाठी

मेट्रोने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे सीताबर्डी इंटरचेंज स्टेशन येथून पहिली फेरी सकाळी आठ तसेच शेवटची फेरी रात्री आठ वाजता असेल. खापरी स्टेशन येथून पहिली फेरी सकाळी आठ वाजता तर शेवटची फेरी रात्री 8.30 वाजता राहणार आहे. दर मिनिटांनी ताशी 80 च्या वेगाने एका दिवसात या दोन स्टेशनदरम्यान मेट्रोच्या शंभर फेऱ्या होणार आहेत. 

नागरिकांच्या मागणीची दखल

गेल्या काही दिवसांपासून मेट्रोचा वेग ताशी 80 किमीपर्यंत करण्यात यावा आणि दर 15 मिनिटांनी मेट्रोची प्रवासी सेवा उपल्बध व्हावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती. त्यामुळे यासाठी आवश्‍यक सर्व चाचण्या पूर्ण करण्यात आल्या. रेल्वे बोर्ड, रिसर्च डिझाईन ऍण्ड स्टॅंडर्ड ऑर्गनायझेशन (आरडीएसओ) आणि मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी (सीएमआरएस) महामेट्रोला याबाबत सर्व मंजुरी दिली. मंजुरी मिळताच महामेट्रोने प्रवाशांसाठी दर 15 मिनिटांनी सेवेचा निर्णय घेतला आहे. 

25 मिनिटांचा कालावधी

सीताबर्डी इंटरचेंज ते खापरी प्रवास करताना केवळ 25 मिनिटांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे मिहान स्थित विविध कंपन्यांमध्ये नोकरीसाठी प्रवास करणारे कर्मचारी तसेच सीताबर्डी मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी येणाऱ्या वर्धा मार्गावरील विविध रहिवासी क्षेत्रातील नागरिकांसाठी कमी वेळेत मेट्रोची सुविधा सुरू होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Metro every 15 minutes in nagpur